| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ ऑक्टोबर २०२४
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे महाराज झालेले भाजपचे नेते शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी मोठे शक्तीप्रदर्शन करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना शिवाजी डोंगरे म्हणाले की, सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी आपल्याला अमान्य आहे. यापूर्वी मी २ वेळा उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यावेळी २०२४ मध्ये भाजपने मला पक्षाची उमेदवारी देतो, असे आश्वासन दिले होते. आता मला उमेदवारी न दिल्यामुळे शहरात वेगळे वातावरण आहे. मला फसवले गेले आहे. सामान्य माणसांमध्ये वेगळा उत्साह आहे. त्यामुळे मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. मी येत्या २३ नोव्हेंबर या दिवशी १०० टक्के निवडून येणार आहे. मला सामान्य जनतेचा प्रतिसाद आहे. माझी टक्कर कुणाशी नाही. माझी निवडणूक सामान्य लोकांनी हातात घेतली आहे. सर्व जाती-धर्मातील लोक माझ्या पाठीशी १०० टक्के आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.
डोंगरे यांनी बंडखोरी केल्याने त्याचा पहिला फटका भाजपला बसला आहे. डोंगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. शिवाय त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्षपद ही भूषवले आहे.
या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीला शिवाजी डोंगरे यांनी विरोध दर्शवला आहे. पक्षाशिवाय निवडणूक लढणार, असा निश्चय त्यांनी माधवनगर येथे झालेल्या बैठकीत केला होता.
भाजपमध्ये बंडखोरी होऊ नये. नेत्यांमध्ये नाराजीचे प्रमाण अधिक वाढू नये, यासाठी अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे नाराजीचे सूर उमटत आहेत. सांगली प्रमाणेच जत आणि शिराळा हे दोन्ही बंडखोरीचे लोण समोर आले आहे. जत येथून रवी तम्मणगौडा पाटील यांनी तर शिराळा येथून सम्राट महाडिक यांनी बंडखोरीचे दंड थोपटले आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी भाजपच्या उमेदवारासमोर डोकेदुखी वाढली आहे.