Sangli Samachar

The Janshakti News

यातून आपल्याला कांही शिकता येईल का? - (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ३ ऑक्टोबर २०२४
सीताराम माणजोगे यांचे ‘कायापालट’ (प्रथम आवृत्ती ऑक्टोबर, १९९०, प्रकाशक - अशोक केशव कोठावळे, मॅजस्टिक प्रकाशन) हे पुस्तक मी नुकतेच वाचले. 

पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हंटले आहे, “फुकट वादावादी करून व गटार उपसेपणा करून मूळ प्रश्न सोडून चर्चा करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे फक्त गोंधळ निर्माण होईल. .... अजून माणसे जगात काळे-गोरे हा वाद, सगळी माणसेच असूनही सहृदयतेने न सोडवता शारीरिक वर्णानेच सोडवायला जातात व दोघेही स्वतःच नाश करून घेतात. गौर वर्णीय लोक निग्रोंना मानवी हक्कांपासून मानवी जीवन जगण्यापर्यंत कसे वंचित करतात व कुत्र्या-मांजरापेक्षाही कसे कमी लेखतात या हकीकती कितीही कारणे दिली तरी समजण्यासारखी नाहीत. .... 

मी जर्मनीतला ज्यू समजू शकतो. मेक्सिको मधला दलित समजू शकतो. संदर्भ निरनिराळे,
पण गोष्ट मात्र एकच. .... 
आपल्या सद्विवेकबुद्धीशी विचार करून आपणच काय तो घडा घ्यायचा आहे, की आपण माणुसकीला किती पारखे झालेले आहोत ! यावरून शरीर, मन आणि बुद्धिमत्ता यात प्रथम दर्जाचा नागरिक म्हणवणाऱ्या गो-या माणसाला, दुसऱ्या वर्गाच्या नागरिकत्वाच्या खाते-यात फेकल्यामुळे, किती फरक जाणवतो, हे स्पष्ट दिसून येईल. - जॉन हॉवर्ड ग्रीफीन” 

जॉन हॉवर्ड ग्रीफीन या गो-या अमेरिकन लेखकाने दक्षिण अमेरिकेतील निग्रोवर होणाऱ्या अत्याचाराची सत्य परिस्थिती जाणण्यासाठी डॉक्टरी उपाय व औषधांच्या सहाय्याने आपली गोरी कातडी कांही काळापुरती काळी करवून घेतली. आणि एक निग्रो बनून तो दक्षिण अमेरिकेत (१९५०-६० च्या दशकात?) सहा आठव़डे वावरला. 

‘कायापालट’, हे पुस्तक गोरे लोक काळ्या लोकांना कशी वागणूक देत होते यावर आहे. पुस्तकात दक्षिण अमेरिकेतील गो-या वर्णाचे कांही लोक तेथील काळ्या वर्णांच्या लोकांना कशी अपमानजनक, तिरस्काराची, दुय्यम दर्जाची वागणूक देत होते याच्या घटना दिल्या आहेत. या पुस्तकाच्या शेवटच्या भागात लिहिले आहे.

“ सर्वात दुःखाची गोष्ट ही की, दोघांत संवादच निर्माण होत नाही. त्याचा उलटप्रभाव निग्रोंच्या वर्णभेदपणावर होतो आणि ते पुष्कळसे न्याय्यही आहे. पण त्यामुळे फार दुष्परिणाम होतात. जी कांही सुसंस्कृत चांगली माणसे दोघांमध्ये चांगली चांगले वातावरण निर्माण व्हावे म्हणून ध़डपड करतात ती बाजूला राहून दोघात अंतर मात्र वाढत जाते. यामुळे गो-या वर्णभेद्यांची बाजू मजबूत होते. 


निग्रोंना आता कुठे आपल्या स्वातंत्र्याविषयी जाणीव झाली आहे. ते गो-यांविषयी कमालीची तेढ दाखवितात आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, गोरे वर्णभेदी पण हीच चूक करतात. आणि मग या गोष्टींना काही मर्यादाच राहात नाही. बहुतेक सर्व लढाऊ निग्रो पुढारी, निग्रोंचे वर्चस्व पढवतात. माझी अशी प्रार्थना आहे की, निग्रोंनी आत्तापर्यंत ज्या हालअपेष्टा, अपमान सोसले त्यातून एक होऊन, आपली शक्ती मजबूत करून सूडाची भावना न ठेवता आपला उत्कर्ष साधावा आणि उत्कर्ष करून घेण्याची संधी सोडू नये. 
यातून जर एखाद्या अविचारी ठिणगीने पेट घेतला तर ती एक अविचारी दुःखांतिका होईल. अजाणाविरुद्ध अजाण, अन्यायाविरुद्ध अन्याय अशा प्रकारची एक प्रचंड वावटळ निरपराध आणि सुविचारी समाजाला नाशाच्या गर्तेत खेचून नेईल. आणि मग फार पूर्वीच आपण न्यायासाठी ओरड का केली नाही याची किंमत आपल्या सर्वांनाच मोजावी लागेल.” 

प्रस्तावनेपासून हे पुस्तक पूर्ण वाचून संपले की, एकच विचार मनात सतत घोळत राहातो, “प्रांत, प्रदेश कोणताही असो, काळ कोणताही असो, जोपर्यंत माणूस वर्ण, वंश, कातडीचा रंग आणि धर्म, जात, पात, पंथांच्या कारणांने, निमित्ताने पूर्वग्रहदुषित विचारांने, पूर्वी घडलेल्या घटनां मनात ठेऊन, आपल्या अहंकारापोटी, स्वार्थापोटी दुस-या माणसाचा तिरस्कार करीत राहणार आहे, द्वेष करीत राहणार आहे, दुसऱ्या व्यक्तिला नष्ट करण्याचे अमानवी कृत्य करीत राहणार आहे, तो पर्यंत कुणालाच खऱ्या अर्थाने सुख, समाधान, शांती लाभणार नाही. आणि ही सुंदोपसंदी अशीच चालू राहली तर, भगवंताने निर्माण केलेली ही पृथ्वी व त्यावरील मानव जात लवकरच नष्ट होणार हे नक्की.” 

पण यातून आपल्याला कांही शिकता येईल का ? - आजचे बोल अंतरंगाचे इथे पूर्ण