| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजून आठवड्याचा कालावधी लोटला. निवडणुकीसाठीचा कार्यक्रम ही जाहीर झाला. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यातील जवळपास सर्व मतदारसंघात मातब्बरांनी अर्जही दाखल केले. सांगली आणि मिरज विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडून बेदखल करण्यात आला आहे. अर्थात याला कारणही या दोन मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा.
सांगली विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये निसटत्या मतांनी अपयश पदरी आलेले, सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी दंड थोपटले आहेत. गेली पाच वर्षे ते विविध आंदोलने, सामाजिक उपक्रम, आणि मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. गेली दहा वर्षे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही.
सुरुवातीस पक्षातील मातब्बर नेत्यांनी या साऱ्याची दखल घेत त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीबाबत शब्द दिला. माजी मंत्री व काँग्रेसचे युवा नेतृत्व डॉ. विश्वजीत कदम यांनी तर जाहीर भाषणात श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना आमदार कर, असा शब्द दिला. सध्या ते यासाठी आहेतही. मात्र त्यांच्यासमोर धर्मसंकट उभे राहिले आहे ते, श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या रूपाने.
2019 च्या निवडणुकीत श्री. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आपणास पुढील निवडणूकीत तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा मी तुमच्या पाठीशी राहीन, असा शब्द दिल्याचे सांगत, श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारीसाठी पदर खोचला आहे. त्यांच्या पाठीशी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील हे उभे राहिले आहेत. जिल्ह्यात कार्यरत असलेला मदन भाऊ पाटील गटही या निमित्ताने सक्रिय झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे धोरण ज्यांच्या खांद्यावर आहे ते खा. विशाल पाटील व डॉ. विश्वजीत कदम यांच्यासमोर उमेदवार निवडीचे आव्हान उभे ठाकले आहे. या दोन्ही नेत्यांनी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली श्रीमती जयश्रीताई पाटील हे दोघेही. परंतु श्री. पृथ्वीराजबाबा पाटील अथवा श्रीमती जयश्रीताई पाटील हे दोघेही मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे हा तिढा सोडवण्याची जबाबदारी राज्य पातळीवरील नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे.
सध्या महाआघाडीतील झालेली बिघाडी दुरुस्त झाली असून आज रात्री किंवा उद्या सर्व मतदार संघातील उमेदवार निश्चित करण्यात येतील असे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. आता या यादीत सांगली शहरातील श्री. पृथ्वीराज बाबा पाटील की श्रीमती जयश्रीताई पाटील यापैकी कोणाची वर्णी लागते, आणि कोण बंडखोरी करतो याकडे सांगलीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सांगली प्रमाणे मिरजेतेही उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे. नुकतेच भाजपमधून प्रवेशकर्ते झालेले, एकेक काळचे ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे स्वीय सहाय्यक असलेले, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रा. मोहन वनखंडे यांना काँग्रेसमधून उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघातील बंडखोरीचे वारे वाहत आहे. गेली अनेक वर्ष पक्षाशी इमान राखून असलेले अनेक दिग्गज नेते उमेदवारीसाठी प्रतीक्षेत होते. मात्र या साऱ्यांना बाजूला करून, काँग्रेस पक्षाने प्रा. मोहन वनखंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने येथून बंडखोरीच्या रिंगणात कोण कोण उतरणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
त्यामुळे सांगली व मिरज विधानसभा मतदार संघातील 'बंडोबांना थंडोबा' करीत, महायुती समोर एकास एक बलाढ्य उमेदवार देण्यासाठी राज्यपातळीवरील नेते काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.