yuva MAharashtra अखेर, निष्ठा व कष्टाचे फळ मिळाले, सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराजबाबा पाटील यांची काँग्रेस तर्फे उमेदवारी जाहीर !

अखेर, निष्ठा व कष्टाचे फळ मिळाले, सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराजबाबा पाटील यांची काँग्रेस तर्फे उमेदवारी जाहीर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑक्टोबर २०२
गेल्या आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर काँग्रेस पक्षातर्फे सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज बाबा पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी केलेल्या उमेदवारीच्या दाव्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. 

सांगली जिल्हा काँग्रेसचे युवा नेतृत्व माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशालदादा पाटील यांच्या मध्यस्थीनंतरही श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारी बाबत आपला हट्ट कायम ठेवला होता. त्यामुळे अखेर उमेदवारीचा निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी हा विषय राज्य पातळीवर पोहोचला. तेथेही जयश्रीताई पाटील या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशालदादा पाटील यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला. तत्पूर्वीच पक्ष निरीक्षक खा. प्रणिती शिंदे यांनी ही आपला गोपनीय अहवाल काँग्रेसच्या राज्य व केंद्रीय निवड समितीकडे सादर केला होता. या साऱ्याचा सारासार विचार करून केंद्रीय नेतृत्वाने आपले वजन पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या पारड्यात टाकले व जवळपास आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर पृथ्वीराज बाबांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग सुखकर झाला.


वास्तविक 2019 च्या निवडणुकीतच पृथ्वीराजबाबांना यशाचा गुलाल लागायचा. परंतु अनेक कारणांमुळे त्यांची ही संधी हुकली. मात्र अपयशाने खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून पृथ्वीराज बाबांनी जनसेवेसाठी एल्गार पुकारला. 2019 व 2024 चा महापूर असो किंवा जीवघेणी साथ. पृथ्वीराज बाबांनी जनतेची साथ सोडली नाही. जीवावर उदार होऊन त्यांनी मदतीचा हात संकटग्रस्तांसाठी पुढे केला होता.

त्यानंतर काँग्रेस पक्षाचे कोणतेही आंदोलन असो किंवा विविध संघटनांचे आंदोलन पृथ्वीराजबाबा पाटील आग्रस्थानी असायचे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीसाठी ते नेहमीच धावून जायचे. प्रसंग आनंदाचा असो की दुःखाचा पृथ्वीराज बाबा तेथे उपस्थित असायचे. परिणामी त्यांच्याबाबत समाजाचा मोठ्या प्रमाणावर "आपला माणूस" म्हणून उच्च प्रतिमा निर्माण झाली होती. 

त्यानंतर पृथ्वीराजबाबा पाटील यांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच पातळीवर समाजाशी नाळ जोडली गेली. अयोध्येची राम मंदिर प्रतीकृती असो किंवा मग नवदुर्गा मंदिर. अगदी सर्वच समाजाच्या धार्मिक उत्सवात पृथ्वीराजबाबांनी हजेरी लावली होती. त्यांचा हा पैलूही समाजाला आपलेसे करणारा होता.

त्यानंतर "तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं !" ही अभिनव संकल्पना घेऊन पृथ्वीराजबाबा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सोडवण्याचा शब्द त्यांनी दिला. या साऱ्यांचा साकल्याने विचार करता, काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी देणे क्रमप्राप्त होते. मात्र श्रीमती जयश्रीताई यांच्या उभ्या दाव्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब लागत होता.

एकीकडे जयश्रीताईंचे कार्यकर्ते आक्रमकपणे उमेदवारीसाठी मेळावे घेत होते, त्यावेळी काँग्रेस पक्षाचा आणि श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्याबाबत आदरयुक्त भावनेने पृथ्वीराज बाबा आपल्या कार्यकर्त्यांना संयमाची भूमिका घेण्यास भाग पाडत होते. अखेर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने पृथ्वीराज बाबांना उमेदवारी देऊन एका सच्या कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. जबाबदारी आहे ती मतदारांची. 2019 साठी पृथ्वीराज बाबांचा हुकलेला विजयाचा गुलाल 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लागलाच पाहिजे, असा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.