yuva MAharashtra श्री. विकास सूर्यवंशी राज्यस्तरीय आदर्श वृत्तपत्र विक्रेता संघटक पुरस्काराने सन्मानित !

श्री. विकास सूर्यवंशी राज्यस्तरीय आदर्श वृत्तपत्र विक्रेता संघटक पुरस्काराने सन्मानित !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑक्टोबर २०२४
वृत्तपत्र विक्रेता संघटना क्षेत्रात गेली २५ वर्षे काम करणाऱ्या सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी यांना नांदेड जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळाच्यावतीने कामगार नेते अनंतराव नागपूरकर राज्यस्तरीय आदर्श वृत्तपत्र विक्रेता संघटक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नांदेड येथील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते व राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, दिनेश उके, विनोद पन्नासे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

नांदेड जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळाच्या वतीने त्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यास राज्यस्तरीय आदर्श वृत्तपत्र विक्रेता संघटक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी पुरस्काराचे पाचवे वर्षे होते. पाचव्या वर्षीचा हा पुरस्कार सांगली येथील सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात आला होता. कोणताही प्रस्ताव न घेता, राज्य संघटनेच्या माध्यमातून कामाचे मूल्यमापन करून नांदेड संघटनेच्या वतीने या पुरस्काराची निवड केली जाते.


श्री विकास सूर्यवंशी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी शहर, जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र व राज्य पातळीवर केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत राज्य कार्यकारणी सदस्य चंद्रकांत घाटोळे यांनी केले.

सुरुवातीस प्रास्ताविक नांदेड संघटनेचे अध्यक्ष व राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी केले. श्री पवार यांनी सांगितले की, पंचवीस वर्षांपूर्वी सांगलीमध्ये विस्कळीत झालेली वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बांधणी नव्याने बांधून श्री. विकास सूर्यवंशी यांनी कामास सुरुवात केली. शहर, महापालिका क्षेत्र तसेच जिल्हा पातळीवर नवीन कार्यकर्ते, पदाधिकारी निर्माण केले. त्यांना संघटनेच्या कामात कार्यरत केले. त्याचबरोबर पंढरपूर, सातारा, सोलापूर, बार्शी या ठिकाणी संघटना उभारणी व वाढीसाठी मदत केली. इचलकरंजी व कोल्हापूर येथेही वृत्तपत्रे विक्रेत्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सहकार्य केले.

सांगली येथे देशातील पहिले वृत्तपत्र विक्रेता भवन उभारणीसाठी प्रयत्न करून ते यशस्वी करून दाखवले. सांगली बरोबरच मिरजेतसुद्धा वृत्तपत्र विक्रेता भवन असावे यासाठी सर्वप्रथम मागणी करून त्यासाठी पाठबळ देत मिरजेत ही वृत्तपत्र विक्रेता भवन उभारण्यास हातभार लावला.

राज्य संघटनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला वृत्तपत्र विक्रेता दिन राज्यासह देशभर पोचवण्यासाठी शासन पातळीवर निवेदन देऊन पाठपुरावा करणे, वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी गेली दहा-बारा वर्षे सतत पाठपुरावा करणे, सरचिटणीस पदाची जबाबदारी घेतल्यानंतर वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी मोठी गती दिली, एकूणच गेल्या २५ वर्षात श्री सूर्यवंशी यांनी वृत्तपत्र विक्रेता व विक्रेता संघटना यामध्ये केलेल्या कामाची पोचपावती म्हणून श्री. विकास सूर्यवंशी यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी संयोजक व राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी दिली.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना विकास सूर्यवंशी म्हणाले की, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे. शहराध्यक्ष पदापासून, राज्य संघटनेच्या सरचिटणीसपदासारख्या महत्वाच्या पदावर पोहचेपर्यंत कुठेही वैयक्तिक स्वार्थ न पाहता वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले. या पुरस्कारामुळे जबाबदारीत अजून वाढ झाल्यासारखे वाटते. या पुढेही संघटनेच्या कामात याच ताकदीने काम करत राहीन.

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांनी  श्री. विकास सूर्यवंशी यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नांदेड येथील कामगार नेते प्रदीप नागापूरकर, पत्रकार संतोष पांडागळे, प्रल्हाद उमाटे, नांदेड येथील सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे वितरण अधिकारी, पत्रकार यावेळी उपस्थित होते.

बालाजी चंदेल, गणेश वडगावकर (सचिव), बाबू जल्देवार (कोषाध्यक्ष), खम पठाण (समिती कोषाध्यक्ष), भागवत गायकवाड (प्रसिध्दी प्रमुख) आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. पुरस्कार प्राप्त विकास सूर्यवंशी यांनी या पुरस्कार सोबत मिळालेली रक्कम राज्य संघटनेसाठी देणगी म्हणून दिली. राज्य संघटनेने सुरु केलेल्या स्वावलंबी कल्याणकारी कोषमध्ये या रक्कमेचा वापर करावा अशी विनंती केली.

सांगलीपासून राज्य पातळीपर्यंत आपल्या धडाडीने, कार्यकर्तृत्वाने श्री. विकास सूर्यवंशी यांनी केलेल्या कार्याचे पोच पावती म्हणजे हा सन्मान होय. सांगली समाचार परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.