| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑक्टोबर २०२४
मदनभाऊंच्या पश्चात माझ्या कार्यकर्त्यांना मी कधीही वाऱ्यावर सोडले नाही, सोडणारही नाही. परंतु कोणताही निर्णय भावनिक होऊन न घेता विचारपूर्वक घ्यायला हवा. मी पळणारी बाई नाही लढणारी बाई आहे. मात्र जो निर्णय घ्यायचा आहे तो मोठा आहे. इतकेच सांगते, ज्यांनी आपल्याला गाढायचा प्रयत्न केला, त्याला आपण गाढायचे आहे इतकेच लक्षात ठेवा. असा इशारा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी मदन भाऊ पाटील गटातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला.
सांगली विधानसभेची उमेदवारी श्रीमती जयश्रीताई पाटील यांना न मिळाल्याने, विष्णुअण्णा भवन येथे विचार विनिमय करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीमती पाटील बोलत होत्या. जयश्री ताईंना उमेदवारी डावलेल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. यामध्ये जयश्रीताईंचे जावई जितेश कदम यांचाही समावेश होता.
मदनभाऊंच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे काम मी केले. काही आपल्याला सोडूनही गेले. परंतु जे गेले ते मला सांगून गेले. माझी इतकीच भावना होती, मदन भाऊंचा कार्यकर्ता मोठा व्हायला हवा. दिवंगत महापौर हारुणभाई शिकलगार यांचे स्मरण करून जयश्रीताई म्हणाल्या की, त्यावेळी केवळ दोन नगरसेवक माझ्याबरोबर होते. साऱ्यांचा विरोध डावलून मी हारुणभाईंना महापौर केले. माझ्या कार्यकर्त्यांसाठी ते काही करता आले, जितके काही देता आले ते मी दिले, असे यावेळी बोलताना जयश्रीताई म्हणाल्या.
यावेळी पुढे बोलताना जयश्रीताई म्हणाल्या की, आपल्याला पळायला लावले. काल जो निर्णय झाला तो कदाचित काहींना आधीच ठाऊक होता. माझी कोणतीही अपेक्षा नाही. फक्त त्यांनी इथं येऊन सांगायला होतं, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण तेच झाले नाही. मग आपण कोणासाठी इतकं का करायचं ? असा सवाल करून जयश्रीताई म्हणाल्या की, आता कुणाला जिंकवण्यासाठी आपला वापर कोणी करून घेणार असेल तर ते इथून पुढे होऊ देणार नाही.
यावेळी जयश्रीताईंनी आपला पुढील निर्णय आज रात्रीपर्यंत घेऊ असे सांगितले. त्यामुळे जयश्रीताई निवडणूक रिंगणात उतरणार, की पक्षाला महत्त्व देऊन थांबणार याबाबत उत्सुकता लागली आहे. आज रात्री त्या काय निर्णय घेतात यावर पुढील गणिते अवलंबून राहणार आहेत.
यावेळी माजी मंत्री प्रतीक पाटील, जितेश कदम, माजी महापौर किशोर शहा, पानपट्टी असोसिएशनचे नेते अजित सूर्यवंशी, युनोस महात यांच्यासह जयश्री ताईंचे कट्टर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.