| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मिरज शहर हे वैद्यकीय पंढरी म्हणून लौकिक आहे. मिरज, सांगली परिसरातील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले सुमारे 400 हॉस्पिटल आहेत. शिवाय, मिरज रेल्वे जंक्शन, अवघ्या 15 किमी अंतरावर कवलापूर येथील विमानतळबरोबरच अन्य दळणवळण साधन सामुग्री उपलब्ध असल्याने मिरजेत "एम्स" हॉस्पिटल होण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी मिरज सुधार समितीने माजी केंद्रीय मंत्री, जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे.
जेष्ठ नेते शरद पवार हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता, शुक्रवारी सकाळी सांगली येथे मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष नरेश सातपुते, मन्सूर शेख, संतोष जेडगे, राजेंद्र झेंडे, राकेश तामगावे आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मिरज हे मेडिकल हब असल्याने येथे "एम्स" हॉस्पिटल होऊ शकते. याबाबत जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मिरजेत "एम्स" हॉस्पिटल होणे शक्य आहे. यासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेण्यासाठी मिरज सुधार समितीच्या वतीने पवार यांना साकडे घालण्यात आले.
मिरजेच्या विविध प्रश्नांवर मिरज सुधार समिती आक्रमक भूमिका घेत असते. विविध सामाजिक कार्यातही समितीचे कार्यकर्ते हिरीरीने सहभागी होत असतात. मिरजेत एम्स रुग्णालय झाले, तर येथे सर्वोत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळू शकतात. सध्या मिरजेत सांगली जिल्ह्यासह शेजारील कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातील बेळगाव हुबळी पर्यंतचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. खाजगी रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मिळणारी वागणूक जगजाहीर आहे. त्यामुळे या सर्वच भागातील नागरिकांची एम्स रुग्णालय भावी असल्याची मागणी होत आहे. यावेळी शरद पवार यांनी मिरज शहर सुधार समितीच्या शिष्टमंडळाला, 'आपण यात लक्ष घालून लवकरात लवकर निर्णय घेऊ' असे आश्वासन दिले आहे.