| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २५ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्वत्र नाकाबंदी आदेश दिले असून, पोलीस व तपास यंत्रणा याबाबत सतर्क झाली आहे. अवघ्या काही दिवसापूर्वीच पुणे बेंगलोर महामार्गावर खेड शिवापुर परिसरात पाच कोटी रुपयांची रक्कम एका कारमधून जप्त करण्यात आली. मात्र याबाबतचा तपास सरकारी हस्तक्षेपामुळे रेंगाळल्याचा आरोप केला जात असल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातच 138 कोटी रुपयांचे सोने असलेला ट्रक सापडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबद्दल 138 कोटींचे सोने पकडले गेले. सातारा महामार्गावर पोलिसांनी नाकाबंदी सुरू असताना ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या या ट्रकमध्ये असलेले कोट्यावधी रुपयांचे हे दागिने नेमके आले कुठून व कोठे जात होते याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. अद्याप या मालकाबाबत कुठलीही माहिती उपलब्ध झाले नसल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
हे बेनामी सोने आहे का ? नेमके निवडणुकीच्या काळातच ते कोठे घेऊन जाण्यात येत होते ? ते कोणाचे आहे ? कोणासाठी होते ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता खेड शिवापूर परिसरात सापडलेल्या बेनामी रकमेप्रमाणेच, सोनेही मूळ मालकाच्या नावाबरोबरच गायब होणार का असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.