yuva MAharashtra आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांचा श्रीमती जयश्रीताई आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात समेट घडविण्याचा प्रयत्न !

आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांचा श्रीमती जयश्रीताई आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात समेट घडविण्याचा प्रयत्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ ऑक्टोबर २०२४
एकीकडे श्रीमती जयश्रीताई व श्री. पृथ्वीराज पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मा. शरदचंद्र पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन उमेदवारीचा दावा केलेला असतानाच, या भेटीच्या पूर्वसंध्येला बुधवारी रात्री सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल दादा पाटील यांनी श्रीमती जयश्रीताई पाटील व श्री. पृथ्वीराजबाबा पाटील या दोन्ही गटात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

सांगली येथे भारती विद्यापीठाच्या सभागृहात सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी बोलताना आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. एकसंघ निवडणूक लढवली की विजय निश्चित असतो, हे लोकसभेला आपण पाहिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही आपली ताकत मोठी आहे. 

लोकशाहीत उमेदवारी मागण्याचा व मते मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्या अधिकारावर गदा येणार नाही असे सांगून आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनीच पक्षाच्या आदेशाचे पालन करायलाच हवे. लोकसभेप्रमाणे सांगली विधानसभा मतदारसंघ आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले तर निश्चितपणे विजय आपलाच आहे.


मात्र यावेळी झालेल्या चर्चेत जयश्रीताई पाटील यांचा गट उमेदवारीसाठी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत जयश्रीताईंनाच मिळायला हवी. ती मिळाली नाही तरी आमची लढण्याची तयारी असल्याचे या गटाने स्पष्ट केले. त्याचवेळी श्री. पृथ्वीराजबाबा पाटील त्यांच्या गटानेही उमेदवारीवर आपला हक्क सांगितला. मात्र यावेळी त्यांनी संयमी भूमिका घेतल्याचे पहावयास मिळाले.

सध्या सांगली विधानसभा मतदारसंघात जयश्रीताई पाटील व श्री. पृथ्वीराजबाबा पाटील दोघेही आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही कार्यक्रम पार पाडायचा असेल तरी दोन्ही गट स्वतंत्रपणे सहभागी होत असतात. मध्यंतरी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांच्याबाबत आहे विधान केल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन असो किंवा नुकत्याच झालेल्या महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त घेतलेला कार्यक्रम असो दोन्ही गटांनी या कार्यक्रमात स्वतंत्र हजेरी लावली होती.

या पार्श्वभूमीवर आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्यासमोर धर्मसंकट उभे ठाकले आहे. ही दोन्ही नेते या वादग्रस्त प्रसंगात काय नि कसा तोडगा काढतात, याकडे कार्यकर्त्यांचा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सांगली विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे. या सर्वांनाच एकच पणे पुढे घेऊन जाण्याचे मोठे आव्हान आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्यासमोर आहेत.

विशेषतः वेगवेगळ्या मतदार संघात वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या खा. विशाल पाटील यांना विरोधकांकडून टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत त्यांचे कार्यकर्ते कुणाच्या पाठीमागे उभे राहणार ? यावर जयपराजयाचे पारडे फिरणार आहे. लोकसभा निवडणुकीत खा. विशाल पाटील यांना काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी ताकद दिली होती. आता पैरा फेडण्याची जबाबदारी खा. विशाल पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे ते सांगली विधानसभा मतदारसंघात काय भूमिका घेतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

एकीकडे नातेसंबंध तर दुसरीकडे पक्षकर्तव्य अशा दुहेरी कात्रीत आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील हे दोन्ही नेते सापडले आहेत. लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांची बंडखोरी काँग्रेस विरोधात नव्हती, तर ती महाआघाडी विरोधात होती. मात्र विधानसभा निवडणुकीत जर जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केली तर काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आणि म्हणूनच या दोन्ही नेत्यांचे पाठबळ कोणाला मिळणार ? हे प्रश्नचिन्ह खूप मोठे आहे.