Sangli Samachar

The Janshakti News

डोंगरी भागातील अपेक्षा पाटीलची कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकास गवसणी, स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड !


| सांगली समाचार वृत्त |
शिराळा - दि. २८ ऑक्टोबर २०२
सांगली जिल्ह्यातील शिराळा हा डोंगरी तालुका म्हणून जातो. तालुक्याच्या सह्याद्रीच्या दुर्गम वसलेल्या छोट्या घनदाट चांदोली व कोरडवाहू शेती भौगोलिक ओळखला जातो. तुटपुंजी अशा प्रतिकूल परिस्थितीत येथील माणसं जगत असतात. आर्थिक चणचण दूर व्हावी उच्व शिक्षण घेता यावं म्हणून अपार कष्ट करीत असतात.

अशा प्रतिकूल परिस्थितीत आरळा येथील गांधी सेवाधाम माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनीने मात्र शालेय कुस्ती राष्ट्रीय शासकीय स्पर्धेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. डोंगरी, दुर्गम, चांदोलीच्या जंगल भागात असणारे आरळा हे छोटेसे खेडेगाव या भागात हाय्यर एज्युकेशन सोसायटी, शिराळा संचलित गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गेली ६० वर्ष ज्ञानदानाचे काम करत आहे. याच शाळेत शिकणारी अपेक्षा वयाच्या १२ व्या वर्षांपासून कुस्तीचे धडे गिरवित आहे. तिला क्रीडाशिक्षक सुधीर बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


बंडगर सरांच्या मार्गदर्शनाखाली आजवर मनिषा पाटील, नबलू गावडे, राहुल सुर्यवंशी, निलेश धामणकर, पार्च देसाई, नदिम डांगे, महेश कळंवे दिया नायकवडी, अभिजीत पाटील, अजित सोंडुलकर इत्यादी खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धा पर्यंत मजल मारली आहे. डोंगरी, दुर्गम, जंगल भागात असणाऱ्या उदगिरी गावची सुकन्या असणाऱ्या अपेक्षा विठ्ठल पाटील या कुस्तीपटूने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवित तालुक्याच्या व जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्राच्या शिरपेचात यशाचा सुवर्ण तुरा खोवला आहे.

अपेक्षा सध्या ११ वी मध्ये आहे. सरावातील सातत्य, योग्य आहार व प्रचंड व्यायाम या त्रिसुत्रीमुळेच अल्पकाळातच तिने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यशस्वी मजल मारली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पाथर्डी (जि. अहिल्यानगर) येथे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये धमाकेदार कामगिरी करत १९ वर्ष वयोगटातील ६२ किलो गटात तीने प्रथम क्रमांक मिळविला. व तीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.

या यशासाठी तिला हाय्यर एज्युजकेशन सोसायटीचे पदाधिकारी, संचालक सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एस. घोरपडे पर्यवेक्षक आर. डी. देसाई यांचे सहकार्य लाभले. क्रीडाशिक्षक सुधीर बंडगर यांचे मार्गदर्शन तर आंतररराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे यांचे प्रशिक्षण लाभले, तर वडील विठ्ठल पाटील व आई यांचे प्रोत्साहन लाभले. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

अपेक्षा हिचे यश डोंगरी भागातील व समस्त मुलीसाठी आदर्शवत व प्रेरणादायी आहे. मुलींना खेळामध्ये स्वातंत्र्य व प्रोत्साहन दिल्यास त्या कुस्तीसारख्या खेळातही यशस्वी होऊ शकतात असेच अपेक्षाच्या बाबतीत म्हणावे लागेल. आंतरराष्ट्रीय पातळी वरीलही सुवर्णपदकास गवसणी घालणार असल्याचे तिने यावेळी बोलून दाखविले.