yuva MAharashtra राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत यश खंडागळे याने रोवला यशाचा ध्वज, सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव !

राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत यश खंडागळे याने रोवला यशाचा ध्वज, सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑक्टोबर २०२४
सांगली म्हणजे सहकार पांढरी, नाट्य पंढरी, आरोग्य नगरी, हळद, द्राक्ष याप्रमाणेच इतर पिकामुळे जगाच्या नकाशावर आपले स्थान निर्माण केलेले शहर म्हणून प्रसिद्ध आहेच परंतु क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंताने आपल्या दैदिप्यमान कामगिरीने सांगलीचे नाव सातासमुद्रापार केले आहे. आता यश खंडागळे याच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेतील यशाने यावर चार चाँद लावले आहेत...

येथील दिग्विजय वेटलिफ्टींग इन्स्टिट्यूटचे वेटलिफ्टर यश खंडागळे, काजोल सरगर व संकेत सरगर यांची हिमाचल प्रदेश येथे झालेल्या युथ, ज्युनियर व सिनियर राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत 2 सुवर्ण एक रौप्य व एक कास्य पदकासहित नेत्र दीपक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत यश खंडागळेला बेस्ट वेटलिफ्टर ऑफ इंडीया या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. यशच्या या यशाचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे.


नागरोटा बागवान (हिमाचल प्रदेश) येथे 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान झालेल्या युथ, ज्युनियर व सिनियर राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत सांगलीतील सुप्रसिद्ध दिग्विजय वेटलिफ्टींग इंस्टीट्युटचे खेळाडू यश खंडागळे, काजोल सरगर व संकेत सरगर यांनी चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली. 17 वर्षीय यश खंडागळे याने युथ (17 वर्षे आतील) व ज्युनियर (20 वर्षे आतील) कॅटेगरी मध्ये 67 किलो वजन गटात 129 किलो स्नॅच व 152 किलो क्लीन एंड जर्क असे एकूण 281 किलो वजन उचलून सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याला युथ मधील बेस्ट वेट लिफ्टर ऑफ इंडीया हा बहुमान ही मिळाला.

तसेच ह्याच इन्स्टिट्यूटचे खेळाडू 19 वर्षीय कु. काजोल सरगर हिनेही 45 किलो वजन गटात 65 किलो स्नॅच व 84 किलो क्लीन एंड जर्क असे एकूण 149 किलो वजन उचलून ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले. तिचेही सुवर्णपदक मात्र एक किलोच्या फरकात हुकले. काजोल ही यापुर्वी झालेल्या खेलो इंडीया युथ गेम्स ची सुवर्णपदक विजेती आहे.

तसेच सांगलीचा स्टार खेळाडू 2022 राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेता संकेत सरगर यानेही राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान हाताच्या कोप-याला झालेल्या गंभीर दुखापतीवर व तद्नंतर त्यावर झालेया शस्त्रक्रियेवर मात करून तब्बल 2 वर्षानंतर पुन्हा पदार्पण करत 61 किलो वजनी गटात वरिष्ठ स्पर्धेत कास्य पदक पटकावले. काजोल सरगर व संकेत सरगर हे दोघे सख्खे भाऊ बहिण आहेत हे विशेष.

सांगली जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचे अध्यक्ष सुनिल नाईक यांनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी काळात सांगलीतून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू उदयास येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वीस वर्षानंतर बहुमान…

युथ मधील हा बहुमान सांगलीला तब्बल 20 वर्षानंतर मिळाला. यापूर्वी सन 2003 मध्ये श्री सुनिल नाईक यांना हा बहुमान मिळाला होता. त्यानंतर आता सांगलीच्या यश खंडागळेला बेस्ट वेटलिफ्टर ऑफ इंडीयाचा बहुमान मिळाला आहे. त्याच्यावर क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.