Sangli Samachar

The Janshakti News

'मराठा फॅक्टरचा धोका' टाळण्यासाठी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा 'प्लॅन बी' तयार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ ऑक्टोबर २०२४
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा विरोधात असलेल्या जाट समाजाने एकत्र येऊन आव्हान उभे केले होते. मात्र मुख्यमंत्री नायब सैनि यांनी ओबीसी मधील छोट्या छोट्या जातींचे स्वतंत्र मेळावे घेत ओबीसी विरुद्ध जात असे समीकरण बनवले आणि विजयाला गवसणी घातली. तोच पॅटर्न आता भाजपा महाराष्ट्राचाही राबवण्यासाठी 'प्लॅन बी' केला आहे. जर तो यशस्वी झाला तर महायुतीचा सत्ता स्थापनेमधील मोठा अडथळा दूर होणार आहे.

आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा समाज भाजपापासून दूर जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरचा मोठा फटका महायुतीला विशेषतः भाजपला बसला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्यास भाजपा तयार नाही. याचाच एक भाग म्हणून भाजपा मायक्रो प्लॅनिंग करत आहे.

त्यानुसार ज्या मराठवाड्यात भाजपला सर्वाधिक फटका बसला तेथे विधानसभेसाठी ओबीसी समूहाचे एकत्रीकरण आणि मराठवाड्यातील सर्वाधिक जागा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला देत डॅमेज कंट्रोल करण्याचा निर्णय भाजपाच्या नेतृत्वाने घेतला आहे. त्यानुसार नुकतीच महाराष्ट्रातील 15 जाती ओबीसी कॅटेगिरी मध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्त करण्यात आली आहे. गेम चेंजर ठरणाऱ्या या 15 जातींच्या नागरिकांची लोकसंख्या तब्बल दहा लाख इतकी आहे. त्याचा थेट फायदा भाजपा अर्थात महायुतीला होणार आहे.


केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडून जी यादी केंद्र सरकारकडे सुपूर्त करण्यात आली आहे, त्यामध्ये गजर समाजामधील बडगुजर, रेवा गुजर, पोवार, पवार कपेवार, मुन्नार कपेवार, सूर्यवंशी गुजर, रेवा गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, तेलंगा, तेलंगी, लोधा लोधी, डांगरी, पेंताररेड्डी, रुकेकरी या जातींचा समावेश आहे. 

भाजपाच्या या निर्णयावर मनोज जरांगे यांनी टीका केली असून त्यांनी म्हटले आहे की, 'कुंकू एकाच्या नावाने लावायचे आहे, दुसऱ्याचे नाव घ्यायचे ही त्यांची सवय आहे' त्यांना शेतकऱ्यांनी, जाठांनी, मराठ्यांनी मतदान केले असेलच ना ? असा सवाल करून जरांगे म्हणाले की, आम्ही यांचे 106 उमेदवार निवडून दिले होते मात्र दुसऱ्याचं नाव घ्यायचं हे त्यांना सवय आहे. मराठा समाज याचा निश्चित विचार करणार आहे. त्यामुळे भाजपचा हा प्लॅन बी यशस्वी होणार नाही असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आता भाजपाने आखलेल्या प्लॅन बी चा फायदा नेमका कोणाला होतो, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सिद्ध होईल.