Sangli Samachar

The Janshakti News

सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारीचे घोडे मुंबईच्या दारात अडले, सांगलीत रंगला अफवांचा जोरदार बाजार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑक्टोबर २०२
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचे अवघे दोनच दिवस शिल्लक असतानाही सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारीचे घोडे मुंबईच्या दारात अडल्याने कोणताही निर्णय होऊ शकला नाही. सांगलीत मात्र अफवांचा जोरदार बाजार रंगला आहे.

सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील या दोघांनीही उमेदवारीवर हक्क सांगितल्याने, हा वाद स्थानिक नेते सोडवू शकले नाहीत. परिणामी हा तिढा सोडवण्यासाठी राज्य पातळीवरील नेत्यांच्या दरबारात पोहोचला आहे. मात्र महाआघाडीतील तिढा यापेक्षा मोठा असल्याने, तिथेही या दोघांच्या उमेदवारीचा घोळ मिटू शकला नाही.


सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपा बॅक फुटवर असल्याची चर्चा सुरू आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजपला सांगली विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते, विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यापेक्षा संजय काका पाटील यांना कमी होती. यामध्ये संजय काका पाटील यांच्या बद्दलची नाराजी हा मुद्दा असला तरी, वाढती महागाई, बेरोजगारी, अनेक समस्या हे मुद्देही तितकेच महत्त्वाचे होते. आता विधानसभेलाही हेच मुद्दे भाजपचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विजयाआड येऊ शकतात अशी चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर चांगली विधानसभा मतदारसंघात अफवांचा जोरदार बाजार रंगला आहे. कधी काँग्रेसकडून जयश्रीताई पाटील यांची उमेदवारी नक्की झाली की बातमी जोरदार व्हायरल होते, तर कधी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्याचे मेसेज सोशल मीडियावरून पसरवले जात आहेत. 

गत विधानसभा निवडणुकीच्या वेळीही उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याने तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराजबाबा पाटील यांना प्रचारासाठी अत्यल्प वेळ मिळाल्याने याचा थेट परिणाम निकालात पाहावयास मिळाला. आताही तोच कित्ता गिरवला जातो आहे की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. काँग्रेसची उमेदवारी पृथ्वीराजबाबा पाटील यांना मिळो, अथवा जयश्रीताई पाटील यांना. जर उमेदवारी या दोन दिवसात जाहीर झाले नाही तर, पुन्हा एकदा प्रचारातील वेळेचा मुद्दा अडसर ठरू शकतो.

दरम्यान पृथ्वीराजबाबा पाटील व श्रीमती जयश्रीताई पाटील या दोघांनीही गेल्या पंधरा दिवसात मतदारसंघांमध्ये नागरिकांशी साधलेला संवाद, सोशल मीडियाद्वारे केलेला प्रचार आणि प्रसार यामुळे दोघांनाही काँग्रेसप्रेमी मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आणि म्हणूनच काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत मतदार संघात उत्सुकता दिसून येत आहे.