Sangli Samachar

The Janshakti News

"साठीपार तरुणांनी" केली ४००० कि. मी. ची पर्यावरण रक्षण संदेश सायकल यात्रा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑक्टोबर २०२४
वाढत्या प्रदूषणाने केवळ सांगली किंवा महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण जगच विनाशाच्या कड्यावर उभे आहे. त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाय नि प्रयत्न केले जात आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी जगभरातील शासनकर्ते आपापल्या परीने प्रयत्नाची पराकाष्ठा करीत असतानाच, समाजातील काही घटक यामध्ये मागे नाहीत. परंतु जेव्हा साठीपार केलेल्या व्यक्ती प्रदूषण रोखण्यासाठी अवघ्या 22 दिवसात चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करतात तेव्हा 'चर्चा तर होणारच' ! आणि अभिमानाची गोष्ट ही की, यामधील काही सायकल योद्धे आपल्या सांगली परिसरातील आहेत, ही त्याहून अधिक अभिमानाची गोष्ट.


श्रीनगर येथील जगप्रसिद्ध लाल चौकातून सुरू झालेला हा सायकल प्रवास देशातील अकरा राज्यांचे सिमोल्लंघन करीत कन्याकुमारी येथे संपला. चार हजार किलोमीटर प्रवास पूर्ण करण्यासाठी 22 दिवस लागले. यामध्ये सांगलीसह मिरज, जयसिंगपूर, शिरोळ, निपाणी या परिसरातील सायकलपटूंना आचार्य श्री 108 चंद्रप्रभूसागर जी महाराज यांचे शुभाशीर्वाद लाभले होते.


'यासाठी पार केलेल्या तरुणांमध्ये' सुरेश चौगुले (वय 65), किशोर माने (वय 65), रावसाहेब चौगुले (वय 62), अरुण सरडे (वय 62), डीजे पाटील (वय 60) यांचा समावेश आहे. ही सारी मंडळी श्रीनगर येथून निघाल्यानंतर बनिहाल, जम्मू, उधमपुर, पठाणकोट, जालंधर, लुधियाना, कर्नाल, दिल्ली, आग्रा, ग्वालियर, झांसी, जबलपूर, सिडनी, नागपूर, आदिलाबाद, हैदराबाद, बंगळुरू, कृष्णगिरी, सेलम, मदुराई, तिरुनेलवेली ते कन्याकुमारी येथे दाखल झाली.


या संपूर्ण प्रवासात झाडे लावा-झाडे जगवा, बेटी बचाव, सायकल चलाओ देश बचाओ पर्यावरण बचाओ असे विविध संदेश देण्यात आले. या प्रवासादरम्यान या मंडळींचा ठिकठिकाणच्या नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः जेष्ठ नागरिकांचे ठिकाणी कौतुक करण्यात येत होते.

दरम्यान यामध्ये सहभागी असलेल्या किशोर माने यांचा त्यांच्या मित्र परिवारातर्फे ह्रद्य सत्कार करण्यात आला. सध्या सर्वत्र या सायकल प्रवासाचे चर्चा सुरू आहे.