| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने माजी नगरसेवक अल्लाउद्दीन काझी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. अल्लाउद्दीन काझी यांचे वास्तविक मिरज भागात अधिक वर्चस्व आहे. मात्र त्यांना सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवल्यात आल्याने, हा चर्चेचा विषय बनला आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात मुस्लिम व दलितांची मते गेम चेंजर ठरू शकतात. आता वंचित ने खेळलेले अल्लाउद्दीन काझी यांचे हे कार्ड गेम चेंजर ठरणार का ? आणि तो कुणासाठी असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
सांगली विधान सध्या महाआघाडी कडून सांगली शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात ? कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात ? हे अद्यापही गुलदस्तात आहे. जर जयश्रीताईंना डावलेले गेले, तर त्या पुन्हा एकदा 'सांगली पॅटर्न'चे हत्यार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.
तिकडे महायुतीतही संभाव्य उमेदवारांची मानधियाने दिसून येत आहे. विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ, शेखर इनामदार, शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या नीताताई केळकर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. सूत्राच्या माहिती कडून भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर दादा गाडगीळ यांच्या उमेदवारी बाबत ठाम आहेत. अशावेळी गेल्या काही दिवसापासून मतदार संघात निवडणुकीकरिता पेरणी करीत असलेले शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे काय भूमिका घेतात, याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
या पार्श्वभूमीवर 2019 आणि 2024 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या वंचित बहु आघाडीने या विधानसभा निवडणुकीत आपला स्वतःचा उमेदवार उभा केल्याने निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण 2019 असो किंवा 2024 लोकसभा निवडणूक मध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णय ठरली होती. या दोन्ही निवडणुकीतील मतमोजणीमध्ये वंचितमुळे जय विजयाचे पारडे संजयकाका पाटील व विशालदादा पाटील यांच्यात खालीवर होत होते.
त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत अल्लाउद्दीन काझी कोणाची मते खाणार ? आणि कोणासाठी धोकादायक ठरणार ? असा प्रश्न मतदारांमधून विचारला जाऊ लागला आहे. सध्या सांगली विधानसभा मतदारसंघातील चढाओढीमुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा चर्चिला जाऊ लागला आहे.