| सांगली समाचार वृत्त |
छ. संभाजीनगर - दि. ७ ऑक्टोबर २०२४
एकीकडे विरोधकांनी 'लाडकी बहिणी योजनेवरून' शिंदे सरकारला घेरले आहे, तर याच प्रश्नाविरोधात न्यायालयीन प्रक्रिया मही सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. छत्रपती संभाजी नगर येथे 'मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान' अंतर्गत 'मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान' आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा एकत्रित लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री या प्रश्नावरून आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही योजना बंद तर पडणार नाही, उलट टप्प्याटप्प्याने लाभाची ही रक्कम दुप्पट करण्यात येईल. असा शब्दच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी आमच्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये प्रतिमाह दीड हजार रुपयांच्या हिशोबाने तीन महिन्यांची साडेचार हजार रुपये रक्कम जमा झाली आहे. या मिळालेल्या रकमेतून काही बहिणींनी ही रक्कम व्यवसायात गुंतवली असून त्यातून रोजगार व आर्थिक उत्पन्नाचा स्रोत वाढला आहे. आमच्या बहिणी आता सक्षम होत आहेत, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.दरम्यान राज्यातील बहिणी व भाऊही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे असून, शिंदे सरकारची प्रतिमा विविध विकासात्मक कामगिरीमुळे उजाळून निघाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात शिंदे सरकारने लोकप्रिय योजनांचा धडाकाच लावला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटशूळ उठल्याने विरोधक तक्रार करीत असून, खोटा नरेटिव्ह तयार केला जात आहे. परंतु कितीही विरोधी भूमिका घेतली तरी विरोधकांची चाल यशस्वी होणार नसल्याचे भाजपाच्या नेत्यांनी म्हटले आहे.