yuva MAharashtra जतमध्ये विरोध डावलून गोपीचंद पडळकरांनाच भाजपची उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये बंडखोरी !

जतमध्ये विरोध डावलून गोपीचंद पडळकरांनाच भाजपची उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये बंडखोरी !


| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. २७ ऑक्टोबर २०२
जत विधानसभेला भाजपकडून विरोध डावलून आमदार गोपीचंद पडळकर यांनाच संधी देण्यात आली आहे. जतमधील भाजप नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांना जतमधून उमेदवारी दिल्यास बंडखोरी अटळ असल्याचे संकेत दिले आहेत. आज (27 ऑक्टोबर रोजी) त्यांनी मेळावा बोलावला आहे. 18 ऑक्टोबर रोजी विलासराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी जतमधून गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवाराला विरोध केला होता. त्यामुळे जतमधील स्थानिकांना विश्वासात घेऊन भूमिपत्राला उमेदवारी देण्याची मागणी विलासराव जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

दुसरीकडे भाजपने आपल्याला फार मोठी संधी दिली असून या संधीचे जनतेला सोबत घेऊन सोनं करू अशी गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जत जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांनी पेठे भरवून अभिनंदन केले.


दरम्यान विलासराव जगताप यांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. जत विधानसभा निवडणुकीमध्ये तालुक्यातील भूमिपुत्राला उमेदवारी मिळावी, बाहेरून उमेदवार लादू नये यासाठी तालुक्यातील जाणकार, विचारवंत, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची महत्त्वाचे बैठक माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस प्रकाश जमदाडे, तमन्ना गौडा रवी पाटील शंकर वगरे, राजेंद्र कोळेकर हे सर्व विचार मांडणार आहेत. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीमध्ये कोणता निर्णय घेतला जातो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांना जतमधून उमेदवारी मिळाल्यास विलासराव जगताप यांनी स्वतःसह अन्य कोणाच्या रुपातून बंडखोरी अटळ असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजप समोर डोकेदुखी निर्माण झाली आहे. दुसरीकडे विलासराव जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात सोशल मीडियात पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये विलासराव जगताप यांच्यावरती खोचक हल्लाबोल करण्यात आला होता. जर राहुल गांधी वायनवाडला जातात. रोहित पवार शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊन निवडून येतात, त्यावेळी कोणीच भूमिपुत्राचा मुद्दा काढत नाही. मात्र, गोपीचंद पडळकर दुष्काळी देशाचा सुपुत्र दुष्काळी जनतेला न्याय द्यायला दुष्काळी भागातच चाललेला आहे त्यावर मात्र काही जण उगाचच आक्षेप घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांना युतीच्या बद्दल बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही, असे म्हटले होते.