| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑक्टोबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता दिसून येऊ लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यामधील नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार तोफा डागणे सुरू केले आहे. 'सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जे शक्य नाही ते देण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे राज्य भेटी कंगाल होणार आहे,' अशी जोरदार टीका महाआघाडीच्या नेत्यांनी विविध सभा मधून केली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पोहोचली. खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली.
या सभेत विविध वक्त्यांनी शिंदे सरकारवर आपल्या भाषणातून जोरदार टीका केली. परंतु सर्वात जास्त भाषण गाजले ते, गडहिंग्लज तालुका पंचायत समितीचे माजी अध्यक्ष अमर चव्हाण यांचे. यावेळी त्यांनी शिंदे सरकारला अक्षरशः धु-धू धुतलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "आज आणखी सांगितलं जातंय एसटी महामंडळात जशी विमानामध्ये तशी एक परी ठेवलेली असती तशी एसटी परी ठेवणार म्हणतात. आमच्या गडहिंग्लज डेपोची अवस्था जरा बघून घ्या. चंदगडपर्यंत जावा, किमान दोन एसटी बंद पडलेल्या दिसत्यात. या सरकारला आमचं आवाहन आहे, 'ती सुंदरी नको आमच्या एसटीच्या किमान टायरी घाला'. आमची पोरगी सकाळी सहाला उठून एसटीला उभारते आणि त्या पोरगीला एसटी मिळत नाही. तिचं कॉलेज चुकतंय. तुमच्याकडून ती परी बघायची इच्छा नाही. आमची घरातली परी शाळेला चालली या परीला वेळेत पोहोचवा आणि त्या परीला वेळेत घरला आणा आम्हाला सुंदर पऱ्या बघायची गरज नाही. माझ्या जन्माला आलेली पोटाची तीच पोरगी माझी परी आहे. त्या परीला सुरक्षित ठेवा ती परी माझी सुरक्षित नाही."
अमर चव्हाण यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले ते म्हणाले की, 1600 रुपयांचा तेलाचा डबा 2400 रुपयाला गेला. लाडक्या बहिणीला दिले किती आणि लाडक्या बहिणीकडून काढून घेतले तिथे याचं कॅल्क्युलेशन माझ्या माता भगिनींना नक्की सांगावं लागेल. गॅसची टाकी फुकट दिली पण गॅसच्या टाकीचा दहा वर्षातील दर बघितला तर काँग्रेसची सत्ता होती त्या दिवशी चारशे रुपयात गॅसची टाकी मिळत होती. आता तीच टाके अकराशे रुपये च्या पुढे गेली आहे. पेट्रोल 60 रुपये वरून शंभर रुपयांच्या वर गेलं. हे सार भाजप सरकारने वाढवलं आहे. अमर चव्हाण यांच्या प्रत्येक वाक्याला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या च्या गजरात जोरदार प्रतिसाद दिला. सध्या चंदगड मतदारसंघात अमर चव्हाण यांच्याच भाषणाची चर्चा सुरू आहे.