yuva MAharashtra मानसिक आरोग्य दिनानिमित्त परिस फाऊंडेशन आणि नवमहाराष्ट्र संस्था कुपवाड यांच्यातर्फे पोस्टर प्रदर्शन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा !

मानसिक आरोग्य दिनानिमित्त परिस फाऊंडेशन आणि नवमहाराष्ट्र संस्था कुपवाड यांच्यातर्फे पोस्टर प्रदर्शन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ ऑक्टोबर २०२४
परिस फाउंडेशन आणि नवमहाराष्ट्र संस्था, कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य दिनानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन आणि क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात साधारण १००० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनासाठी गर्दी केली होती.

कार्यक्रमाचे उदघाटन नवमहाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब उपाध्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. परिस फाउंडेशनचे अध्यक्ष व मानसतज्ञ डॉ. अजित पाटील, सौ. आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक चिरमे सर, आणि अकुज इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपप्राचार्या श्रीमती रोझिना फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले.


दोन दिवस सुरू असलेल्या पोस्टर प्रदर्शनामध्ये विविध मानसिक आरोग्यविषयक संकल्पनांचे प्रदर्शन करण्यात आले. मानसशास्त्र विषय शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हस्तलिखित आणि प्रिंट केलेल्या पोस्टर्सच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन, स्मृती सुधारणा, एकाग्रता वाढवणे यांसारख्या विषयांवर माहिती दिली. पोस्टर प्रदर्शन पाहायला येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येक पोस्टरवर मत नोंदविण्यासाठी स्टार पद्धतीने मतदान केले.


प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि विजेते शालेय विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्वास्थ्याबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी घेण्यात आलेल्या १० ऑक्टोंबर रोजीच्या प्रश्नमंजुषेमध्ये पाच शाळांनी सहभाग नोंदवला. ज्यामध्ये अकुज इंग्लिश मीडियम स्कूल कुपवाड गटाने प्रथम क्रमांक मिळवला, कृष्णा व्हॅली सेमी इंग्लिश स्कूल दुसऱ्या क्रमांकावर, तर वसंतदादा पाटील इंग्लिश अँड ज्युनियर कॉलेज बुधगाव तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 

महाविद्यालयीन मानसशास्त्रीय विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य तज्ञता प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये केडब्ल्यूसी कॉलेज सांगली प्रथम, इग्नू युनिव्हर्सिटी द्वितीय आणि के बी पी कॉलेज इस्लामपूर तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले.


या कार्यक्रमाच्या समारोपात, पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये उत्कृष्ट सादरीकरणासाठी सर्वाधिक स्टार्स मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. तेजस्विनी सोनवणे (कन्या महाविद्यालय मिरज) यांना तणाव व्यवस्थापन विषयासाठी प्रथम क्रमांक मिळाला, रोहित गाडे (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर) यांना एकाग्रता व स्मरण कौशल्य विषयासाठी द्वितीय क्रमांक, तर स्वप्नाली सोमासे (कन्या महाविद्यालय मिरज) यांना स्मृती सुधारणा मार्ग विषयासाठी तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यांना परिस फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा उर्मिला अजित पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
 
परिस फाउंडेशन आणि नवमहाराष्ट्र संस्थेच्या वतीने आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याचे उद्दिष्ट व्यक्त करण्यात आले.