Sangli Samachar

The Janshakti News

घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो... (✒️राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १७ ऑक्टोबर २०२४
आजची ज्येष्ठ पिढी खूप आदर्शवादी, चांगल्या विचारांची, आचरणाची, जणू परमेश्वरानंतर हीच मंडळी वगैरे वगैरे आणि तरूण पिढी म्हणजे संस्कार नसलेली, जेष्ठांना मान न देणारी असे चित्र उभे करणारे लेख हल्ली नियमितपणे व्हाट्सअप, फेसबुकवर प्रसिद्ध केले जातात, शेअर केले जातात. अशा लेखांपेक्षा वेगळे मत असलेले लेखही कधीकधी वाचायला मिळतात. वैचारिक भिन्नता असलेले याबाबत माझे विचार मंथन सोबत देत आहे. आता त्यातील डावे-उजवे‌ ठरविण्याचा अधिकार अर्थातच तुम्हा वाचकांचा...

नुकताच एक लेख वाचण्यात आला खूप सुंदर... वाचण्याजोगा आणि विचार करण्याजोगा... आपण मूळ लेखातील लेखकाचं मत पाहूया...

उद्या ह्याच पायरीवर तुम्ही असणार आहात. पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा. कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला घेतला जायचा. त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे. त्यामुळे घरातील देवघरानंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते.

आत्ताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागले. स्वयंपाकघर काय अन् देवघर काय. सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली. वायोनुरूप मोठी माणसं आपल्यातून निघून जात आहेत. त्यामुळे धाक नावाची गोष्टसुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक, शिस्त, संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहिल्या आहेत. पूर्वी ह्याच गोष्टी, चालीरीती घरातील मोठी माणसे सांगायची. म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत. संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति - रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडायलाच पाहिजेत. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहिजेत.


रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी - तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणारं कुणीतरी पाहिजे. मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारं. चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला. घरात कुणीतरी मोठं पाहिजे हो...! एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं, टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण कां करावं ? यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं, घराबाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं, तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं. खरंच घरात कुणीतरी मोठ पाहिजेच...!

पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर, आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर... लिंबू-मिरचीला मानणारे विचार असू देत, की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन... एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबडं मुख असू दे की कमी ऐकू येणारे कान... कसं कां असेना ? पण सांगसवर करणारं घरात कुणीतरी मोठं पाहिजेच...!

ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो. परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसलं तरी निदान सावली तरी देतं.. त्या सावलीसारखीच घरातील मोठी-वयस्कर माणसं असतात. त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहिजेतंच. घरात मोठं कुणीतरी पाहिजेच हो !...

आता माझं मत...

या लेखकाच्या लेखनाचा, मताचा मला आदर आहे. परंतु माझे मत लेखकाच्या मतापेक्षा वेगळे दिले आहे. तरुण पिढीला, नव्याला दोष देणारे आणि आमचा काळ, आमचे वागणे तेच फक्त योग्य असे म्हणता येईल का ? आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या, धावपळीच्या, प्रचंड ताणतणावाच्या काळात सद्याची तरूणपिढी दिवसभर राबराब राबत असते. कामावरून बस, रेल्वेचे धक्के खात संध्याकाळी दमुनभागून घरी परतल्यावर त्यांच्यासाठी एखादा कप चहा मिळणे, थोडी विश्रांती, करमणूक अधिक आवश्यक की त्यांनी शुभं करोती म्हणणे, ध्यान धारणा, पुजा करणे अधिक आवश्यक ?

 सध्या जे ज्येष्ठ आहेत ते नोकरी व्यवसाय करत असताना दररोज शुभंकरोती म्हणत होते का ? आणि म्हणत असले तरी त्याचा भावार्थ जाणून त्या प्रमाणे आचरण करत होते कां ? आजच्या तरूण पिढीतील कांही जण आपल्या घरातील ज्येष्ठांची काळजी घेत घेत नसतीलही, पण सर्वच तरूणांना ते तसे आहेत असे समजणे कितपत योग्य आहे ? माझ्या मते तर आजचे तरूण, जेष्ठांसाठी खुप कांही अधिक करत नसले तरी जे आवश्यक आहे उदा. औषधपाणी, अन्न, कपडे तितके तरी निश्चितपणे करत आहेत. ज्येष्ठाना मान देत आहेत.

 त्यामुळे घरातील मोठ्यांनी खूप अपेक्षा न ठेवता जे आहे ते समजून त्यात समाधान मानले पाहिजे. ठेविले अनंता तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. जीवन सुखी, समाधानी, आनंदाचे करण्यासाठी संतांनी सांगितलेला उपदेश ध्यानात ठेऊन आचरणात आणण्याचा मनापासुन प्रयत्न केला असता ज्येष्ठांचा वानप्रस्थाचा काळ तर आनंदमय होतोच होतो. शिवाय हे सर्व इथेच टाकून अंतिम प्रवासाचा मार्गही सुलभ होतो. 


वरील सर्व वैयक्तिक अनुभवावर आधारित माझी मते आहेत. ती इतरांना पटतील असे नाही आणि त्यांनी ती पटवून घ्यावीत असेही मी म्हणत नाही. 
मला फक्त इतकेच सांगायचे आहे की, असे शेअर केलेले लेख सतत वाचले की, आपल्या मनाची, विचारांची धारणा तशीच होऊन संताच्या उपदेशापासुन आपण दूर जातो.

त्यामुळे दृष्टीकोनात बदल करणारे (चांगला की वाईट हे ठरविण्याचा प्रत्येकाचा अधिकार)असे लेख न वाचणे, वाचण्यात आले तरी ते इतरांना शेअर न करणे मला योग्य वाटते. 
वरील सर्व माझी वैयक्तिक मते आहेत इतरांच्या मताशी ती जुळतीलच असे नाही. परंतु आपले मत, विचार मनात ठेऊन "फार छान," किंवा अंगठ्याचा किंवा अंगठा व तर्जनी जोडलेला ईमोजी कोमेंट ओब्लिगेशन म्हणून देणे मला दांभिकपणा वाटतो.  
असो...‌ धन्यवाद...