Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत पाटीलकी कुणाची ? जयश्रीताईंसाठी प्रतीक पाटील रिंगणात, लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होणार का ?


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑक्टोबर २०२४
लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार श्री. विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळलेले माजी मंत्री श्री. प्रतीकदादा पाटील हे आता आपल्या काकी श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात लोकसभेची पुनरावृत्ती होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात स्व. मदनभाऊ पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसाच खा. विशालदादा व श्री. प्रतीक पाटील यांचाही स्वतंत्र गट आहे. 

खा. विशाल पाटील यांनी जाहीररीत्या श्री. पृथ्वीराजबाबा पाटील अथवा जयश्रीताई पाटील यापैकी कुणाचीच बाजू घेतली नसली तरी, लोकसभा निवडणुकीत खंबीरपणे आपल्या पाठीशी उभ्या राहिलेल्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या बाबत सॉफ्टकॉर्नर असणे, स्वाभाविक मानले जात आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे नाते की पक्ष हे धर्मसंकट उभे टाकले आहे. परंतु प्रतीक पाटील यांनी मात्र काल उघडपणे बैठक घेऊन कार्यकर्त्यांना जयश्रीताई पाटील यांच्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

आणि म्हणूनच सांगलीत पाटील की कुणाची ? पृथ्वीराजबाबा की जयश्रीताई पाटील ? असा सवाल आता निर्माण झाला आहे. पक्षाने पृथ्वीराजबाबा पाटील यांना विधानसभेसाठी शब्द दिल्याने त्यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यांची 'तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं !' ही  टॅगलाईन सांगली विधानसभा मतदारसंघात चांगलीच फेमस झाली. दररोज एका घटकाशी पृथ्वीराजबाबा पाटील यांनी संपर्क साधून, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि 'व्हिजन सांगलीचे' यावर अभ्यास करून ब्लू प्रिंट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

परंतु चार वर्षे शांत बसलेल्या जयश्रीताई यांनी अचानक उचल खाऊन आपली बंडखोरी जाहीर केल्याने पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या प्रमाणेच काँग्रेस पक्षासमोरही आव्हान उभे केले आहे. एका बाजूला स्व. मदन भाऊ पाटील यांचा गट आक्रमक झाला असतानाच, आता प्रतीकदादा पाटील यांनीही आपल्या गटाला जयश्रीताई पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आदेश दिल्याने, जयश्रीताईंची बंडखोरी सांगली विधानसभा मतदारसंघात लोकसभेची पुनरावृत्ती घडवून आणणार का ? याची उत्सुकता सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना लागून राहिली आहे.

सांगली जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या आ. डॉ. विश्वजीत कदम यांनीही खा. विशालदादा पाटील यांच्याप्रमाणेच आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. मात्र काही महिन्यापूर्वीच त्यांनी श्री. पृथ्वीराजबाबा पाटील यांना विजयी करण्यासाठी आपण कोणतीही कसर ठेवणार नाही असे जाहीररीत्या सांगितले होते. आणि म्हणूनच जयश्रीताई पाटील की पृथ्वीराजबाबा, यांच्यापैकी आता आ. डॉ. विश्वजीत कदम हे कोणाची बाजू घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

लोकसभा निवडणुकीत खा. विशालदादा पाटील यांच्या विजयात आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा सिंहाचा वाटा होता. आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सहभागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. खा. विशालदादा पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम यांचे वजन ज्यांच्या पारड्यात तो सांगली विधानसभा मतदारसंघातून विजय होणार याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना खात्री आहे. आता या दोघांचे वजन कोणाचे पारड्यात पडणार हे लवकरच दिसून येईल. तोपर्यंत चर्चा तर होणारच.