Sangli Samachar

The Janshakti News

शाळेची पायरी ही चढत नाहीत, कामही करीत नाहीत. तरीही 'त्यांची' कमाई एक लाख रुपयापर्यंत ?


| सांगली समाचार वृत्त |
लखनऊ - दि. २६ ऑक्टोबर २०२
आयुष्यात करियर करण्यासाठी, कुटुंबकबीला सांभाळण्यासाठी उद्योग व्यवसाय किंवा नोकरी करत असतो. आता प्रत्येकाची मासिक कमाई ही ज्याच्या त्याच्या कार्यकर्तृत्वाचा भाग असतो. यासाठी आपण शिक्षण- उच्च शिक्षण किंवा मग एखादा कोर्स करीत असतो. नोकरी नाही जमली तर छोटा मोठा व्यवसाय करत असतो. पण समाजात असा एक वर्ग आहे, जो उच्च शिक्षण राहू द्या, पण शाळेची पायरी ही चढत नाहीत, तरीही त्याची कमाई एक लाख रुपयापर्यंत आहे असे सांगितले, तर तुम्हाला पटेल ? पण ही वस्तुस्थिती आहे.

होय. राज्यातील हा वर्ग म्हणजे भिक्षेकरी. भिक मागून जगणारा हा वर्ग महिन्याला हजारो रुपये कमवतो असे सांगितले तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. भिकारी नाही असे शहर सापडणे कठीण. अर्थात सर्वच भिकारी असे हजारो रुपये कमवेत असतात असेही नाही. पण अनेकदा एखाद्या भिकाऱ्याच्या झोपडीत लाखो रुपयांची रक्कम सापडल्याची बातमी अथवा व्हिडिओ आपण पाहतो आणि आपले डोळे विस्फारतात.

महिना 90 हजार ते 1 लाख रुपये कमावणाऱ्या 5,312 भिकाऱ्यांना लखनऊमधून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.


उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये भिकाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे समाज कल्याण विभाग आणि जिल्हा नागरी विकास संस्था यांनी मिळून एक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सर्वेक्षणामध्ये जवळपास 5,312 भिकारी हे नियमीत काम करणाऱ्या कष्टकरी लोकांपेक्षा जास्त कमावत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे यांची वर्गवारी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. गर्भवती आणि लहान मुलांना कडेवर घेऊन भीक मागणारी महिला दिवसाला 3 ते 4 हजार रुपये कमावते. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुले दिवसाला 900 ते अडीच हजार रुपये कमावतात. या सर्व भिकाऱ्यांकडे महागडे मोबाईल आणि पॅनकार्ड सुद्धा आढळून आले आहे. त्यामुळे सर्व भिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून सर्वांचे एक कार्ड बनवून त्यांना सरकारी योजनेशी जोडले जाणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी सौरभ त्रिपाठी यांनी दिली.

अशीच परिस्थिती, पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद अशा प्रत्येक मोठ्या शहरात आढळून येते. त्यामुळे आता एखाद्या भिकाऱ्याला आपण मदतीच्या उद्देशाने काही रक्कम देत असून तर काळजी घेतलेली बरी. नाही का ? दान हे सत्पात्री असावे. धडधाकट स्त्री-पुरुषांना मदत करण्याऐवजी, आंधळे, अपंग किंवा वृद्ध व्यक्तीस दान करावे. तेही पैशाच्या ऐवजी जर अन्नदान केले तर त्याचे पुण्य अधिक लागेल.