| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ ऑक्टोबर २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळून आली. काँग्रेसने उमेदवारी डावलल्यानंतर नाराज झालेल्या काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जयश्री पाटील आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जयश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस नेते जयश्री पाटील यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का ? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सांगली विधानसभा निवडणुकीसाठी जयश्री पाटील या काँग्रेसकडून इच्छुक असतानाही त्यांना डावलून पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने जयश्री पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. जयश्री पाटील यांनी काल सकाळी ११ च्या दरम्यान विष्णुअण्णा भवन येथे भावनिक झालेल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी संध्याकाळी सांगलीतून काँग्रेस विरोधात अर्ज दाखल करत बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आता थेट पक्षाविरोधात बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. जयश्री पाटील यांच्या भूमिकेमुळे मात्र काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यात अद्यापही स्व. मदन भाऊ पाटील यांना मानणारा मोठा गट कार्यरत आहे. याच गटाने लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र त्याची परतफेड करण्याऐवजी खा. विशाल पाटील यांनी पृथ्वीराजबाबा पाटील यांची पाठराखण केल्याचा आरोप करीत नाराजी व्यक्त केली आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघ आहेत मदनभाऊ पाटील गटाची मोठी ताकद आहे. त्यामुळे पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या विरोधात हा गट सक्रिय झाल्याने याचा फटका त्यांना बसू शकतो, अशी चर्चा त्यावेळी शहरात आहे.
दरम्यान श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या बंडखोरीचा फटका काँग्रेसला बसू नये म्हणून अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत त्यांची नाराजी दूर करण्यात येऊन त्यांच्या गटाचे राजकीय पुनर्वसन करण्याचे धोरण काँग्रेस पक्षाचे तयार केल्याची माहिती एका नेत्याने दिले आहे. आता या गटाकडून यासाठी कितपत प्रतिसाद मिळतो हे लवकरच दिसून येईल. मात्र तोपर्यंत पृथ्वीराजबाबा पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांची धाकधूक वाढणार आहे.