| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑक्टोबर २०२४
दरोडा, जबरी चोरीसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मिरज पूर्व भागात तरबेज उर्फ तबऱ्या चारशिट्या शिंदे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) लावण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी परवानगी दिल्याने या टोळीतील सातजणांवर आता मोक्कांतर्गत कारवाई होणार आहे. टोळीप्रमुख तरबेज उर्फ तबऱ्या चारशिट्या शिंदे, रणजित अशोक भोसले (वय २५, रा. वड्डी), सुरेश रवि भोसले (वय २०, रा. टाकळी बोलवाड), पल्ली भोसले (रा. पाटगाव), अक्षय शहाजी काळे (रा. मालगाव), कुशल आनंदराज काळे (रा. एरंडोली), सिराज उर्फ किरण शिसफुल भोसले (रा. टाकळी बोलवाड) अशी संशयितांची नावे आहेत.
या टोळीने २४ मे २०२४ मध्ये कळंबी (ता. मिरज) येथे पेट्रोलपंपावर वाहन थांबवून झोपलेल्या एका कुटूंबाला चाकूचा धाक दाखवून व महिलेला जखमी करून एक लाख ६९ हजार रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेली होती. या टोळीवर गेल्या दहा वर्षात जिल्ह्यासह मिरज पूर्व भागात १७ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात दरोडा, दुखापत, चोरीचा मुद्देमाल स्वीकारणे अशी गुन्ह्यांची शृखंलाच सुरू ठेवल्याचे निष्पन्न झाले होते. या टोळीविरोधात मिरज ग्रामीण पोलिसांनी मोका कायद्यातर्गंत प्रस्ताव पोलिस अधिक्षकांना सादर केला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठविण्यात आला. मोक्का प्रस्तावाला फुलारी यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता या टोळीविरोधात मोकातर्गत कारवाई होणार आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक रणजित तिप्पे, हवालदार अमोल ऐदाळे, दीपक गट्टे, शशिकांत जाधव, हेमंत ओमासे, सचिन मोरे, विकास भोसले, सुनील देशमुख यांनी भाग घेतला.