Sangli Samachar

The Janshakti News

हरियाणा-काश्मीरमध्ये भाजपा पायउतार, आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील चित्र काय ? राजकीय वर्तुळात खमंग चर्चा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाआघाडी जोरदार तयारी करीत आहे. अद्याप दोन्ही आघाडीवर 288 मतदारसंघात जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या जोरदार फटक्यामुळे महायुती विशेषतः भाजपा ॲक्शन मोडवर दिसत असून, जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहे.

तर इकडे महाआघाडीतही काँग्रेस लोकसभा निवडणुकीत केल्याने त्यांचे हौसले बुलंद झाले आहेत. कमी जागा वाट्याला येऊ नये लोकसभेत राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाला साईडला टाकत, काँग्रेसने ओव्हरटेक केले. आता विधानसभेतही काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर स्वतःचा आमदार बसवायचा आहे.


या पार्श्वभूमीवर आघाडीला हरियाणा व जम्मू काश्मीर मधून आनंदाची वार्ता पोहोचली आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपा पिछाडीवर हसण्याचा एक्झिट पोल हाती आला आहे. या आकडेवारीनुसार हरियाणा व जम्मू काश्मीर मधून भाजपा सत्तेवरून पायउतार होताना दिसत आहे. या दोन्ही ठिकाणच्या निवडणुक निकालांचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर थेट परिणाम होणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापण्यासाठी 46 हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. तिथे काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स बरोबर युती करून निवडणूक लढवली होती. तर मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी आणि भाजपा येथे स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवीत आहे. फक्त अंदाजानुसार येथे इंजिनियर रशीद यांचा आगामी इत्तेहाद हा पक्ष गेम चेंजर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस येतील 40 ते 48 जागा जिंकण्याच्या तयारीत असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. परंतु सत्ता मिळवण्यासाठी त्यांना इतर पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासमोर पीडीपी किंवा अपक्षांचा पर्याय आहेत.

एक्झिट पोल च्या अंदाजानुसार भाजपाला 27 ते 32 जागा मिळू शकतात तर पीडीपी 6 ते 12 जागावर आपला विजय नोंदवू शकते. त्यामुळेच जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स युती सत्तारूढ होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे.

तर हरियाणाही भाजपा दहा वर्षाची सत्ता घालवण्याची शक्यता एक्झिट पोल च्या अंदाजा नुसार वर्तवण्यात येत आहे. या ठिकाणी भाजपला 20 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर येथे काँग्रेस 50 ते 58 जागावर आघाडीवर आहे. पाठोपाठ अपक्षाने येथे मोठी बाजी मारली आहे त्यांना 10 ते 14 जागा मिळू शकतात. आणि म्हणूनच हरियाणातही जम्मू-काश्मीर पाठोपाठ काँग्रेस सत्तारूढ होण्याची शक्यता अधिक आहे.

आता हरियाणा जम्मू काश्मीर पाठोपाठ महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. या दोन्ही राज्याच्या निकालाचा काय परिणाम होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सध्या विविध लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून महायुती आघाडीवर आहे. परंतु त्याचबरोबर वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेली जनता महायुतीच्या पारड्यात आपले मत टाकणार का ? हा मुद्दा आहे. याबरोबरच कळीचा मुद्दा ठरणार आहे तो आरक्षणाचा.

एका बाजूला मराठा तर दुसऱ्या बाजूला ओबीसी व धनगर अशा कात्रीत महायुती सापडली आहे. कोणा एकाला खुश करायला जावे तर दुसरी बाजू नाराज होणार आहे. आणि याचा थेट फटका महायुतीला बसण्याची शक्यता जास्त आहे. अशातच मा. शरद पवार यांनी सांगली येथे बोलताना आरक्षण थेट 75 टक्क्यांपर्यंत नेण्याची मागणी करून आगीत तेल ओतले आहे.

अशातच लाडक्या बहिणीमुळे महिलावर्ग खुश दिसत असला तरी, ही रक्कम जास्त काळ पदरात पडणार नाही हे त्यांनाही ठाऊक आहे. तर दुसरीकडे हीट अँड रन आणि महिलांवर विशेषतः तरुणी आणि लहान मुलींवर होणारे अत्याचार यामुळे राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती सरकार या दोन्ही आघाडीवर सपशेल अपयशी ठरली आहे. 

परंतु महाआघाडीसाठीही सारे काही अलबेल आहे असे नाही. त्यांना सर्वात मोठा धोका आहे तो एकमेकांच्या पायात पाय घालण्याच्या प्रवृत्तीचा. काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा अगदी ठाकरे गट. लोकसभा निवडणुकीत काय घडले हे उभा महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवारांची बंडखोरी ही महाआघाडीसाठी प्रचंड डोकेदुखी ठरणार आहे. तशात लोकसभेतील 'सांगली पॅटर्न' विधानसभेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. यातून महाआघाडीतील नेते कसा मार्ग काढतात यावरच त्यांच्या सत्तेकडे जाणारा महामार्ग सुखकर ठरतो की त्यावर बंडखोरीचे पसरलेले काटे त्यांना सत्तेपासून दूर घेऊन जातो, हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.