Sangli Samachar

The Janshakti News

धनंजय मुंडे यांच्या पत्नी अपघातातून बचावल्या, नेमकी चूक कुणाची ? पोलीस तपास सुरू !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला असून, ना मुंडे यांच्या पत्नी सौ. राजश्री मुंडे यांना सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. सौ. मुंडे या बीड येथून मुंबईकडे प्रवास करीत होत्या.

पोलिसांकडून आणि अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सौ. राजश्री मुंडे या, प्रवास करीत असलेल्या कारने पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी या ठिकाणी ट्रॅव्हल बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. बसचेही थोडेफार नुकसान झाले आहे. 

आता हा अपघात नेमका कशामुळे झाला ? याचा अद्याप उलगडा झाला नाही. ट्रॅव्हल बस अचानक थांबल्याने, सौ. मुंडे यांची कार बसवर आदळली की, पहाटेची वेळ असल्याने कार ड्रायव्हरच्या डोळ्यावर झापड आली होती का ? याबाबत तपास सुरू आहे.


या अपघाताची बीड जिल्ह्यात सर्वत्र माहिती मिळताच, सौ. राजश्री मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आपल्या संपर्कातील ना. मुंडे प्रेमींनी संबंधितांना फोन करून, माहिती घेतली. त्याला अधिक मोठे दुखापत झाले नाही, हे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या अपघाताने स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या कार अपघाताची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. स्व. गोपीनाथजी मुंडे हे नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानातून विमानतळाकडे कारने जात असता, एका भीषण अपघातात त्यांचे देहावसन झाले होते. सुदैवाने ना. मुंडे यांच्या पत्नी सौ. राजश्री मुंडे यांना कोणतीही दुखापत झाले नाही.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सौ. राजश्री मुंडे यांच्या कारला अपघात झाल्याने, ही घातपाताची तर शक्यता नाही ना ? असे ना. धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु पोलिसांनी या शक्यतेचा इन्कार केला आहे.