Sangli Samachar

The Janshakti News

जेव्हा खाकीलाही अश्रू अनावर होतात तेव्हा !...


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ ऑक्टोबर २०२४
ज्यांचे देशभक्तीचे किस्से ऐकत असताना अंगावर शहारे उभे राहावेत. ज्यांच्या माणुसकीचे दर्शन अनेक प्रसंगातून जनतेला घडावे, एक उद्योगपती म्हणून, एक माणूस म्हणून जगत असतानाच भारताच्याच नव्हे तर जगाच्या उद्योग जगतातील नकाशावर ज्यांनी आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले असे एक रतन नवल टाटा नावाचं एक अनमोल 'रत्न'... 

अनेकांच्या हुंदक्यांनी वरळीच्या स्मशानभूमीतील कण अन् कण शहरला असावा. आपल्या मातीत एका अशा नररत्नाची रक्षा मिसळली जातेय, याचा तिलाही अभिमान वाटला असावा... या ठिकाणी उपस्थित असलेल्या, भल्याभल्यांच्या डोळ्यातील अश्रू लपून राहिले नव्हते. पण जेव्हा खाकी वर्दीतील हृदयालाही या कायमचा अलविदा करणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाने पाझर फोडला तेव्हा, हा तर चर्चेचा विषय होणारच...

होय, ज्यांचा सदैव हसमुख चेहरा, नेहमीच कार्यमग्न, उदार अंतःकरणाने दोन्ही हातांनी आपली संपत्ती लुटणारे वंदनीय रतनजी टाटा यांचे पार्थिव पाहिल्यानंतर, अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. स्व. रतनजी टाटा म्हणतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हीआयपी स्मशान भूमी बाहेर पडले अन् सर्व सोपस्कार पार पडेपर्यंत, आपल्या भावनेला कर्तव्याच्या खाकी वर्दीत बंधित करणाऱ्या पोलिसांनी आपल्या अश्रूंना वाट मोहोळ करून दिली...


याबाबतचा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, खाकीलाही अश्रू ढाळायला लावणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख नव्याने जगाला झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण खाकी वर्दी म्हणजे निष्ठूर, कर्तव्य कठोर... केव्हा मग भ्रष्टाचाराचे काळे डाग लागलेली... असेच चित्र समाजासमोर उभे असायचे. पण जेव्हा हा व्हिडिओ व फोटो व्हायरल झाला तेव्हा, 'खाकीलाही अश्रू घालवायला लावणारा अवलिया'अशीच काहीशी प्रतिक्रिया जनतेतून उमटली.

पोलीस अधिकारी म्हटले की, त्याचा एक वेगळाच रुबाब आणि दरारा असतो. खूप कमी वेळा पोलीस अधिकाऱ्यांच्या खाकी वर्दी मागचे कोमल रूप पहावयास मिळते. एरवी कठोर असणारे हेच मुंबई पोलीस रतन टाटा गेल्यानंतर मात्र नतमस्तक होऊन रडताना पाहावयास मिळाले. आणि मुंबई पोलिसांची ही एक नवी ओळख जगायला पहावयास मिळाली...