Sangli Samachar

The Janshakti News

कवठेमंकाळमध्ये भाकरी फिरली, पुत्र प्रभाकर पाटील यांच्या ऐवजी स्वतः माजी खासदार संजयकाका यांनी थोपटले दंड !


| सांगली समाचार वृत्त |
कवठे महांकाळ - दि. २४ ऑक्टोबर २०२४
गेली अनेक दशके तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात स्व. आर आर पाटील विरुद्ध संजयकाका पाटील यांचा राजकीय संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने तर राज्याने पाहिलेला आहे. संजयकाका आणि स्व. आर आर आबा यांच्या या संघर्षाला रक्तरंजीत इतिहास आहे. केवळ विधानसभेलाच नव्हे तर लोकसभा निवडणुकीतही दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची डोकी रक्तबंबाळ झालेली आहेत.

आता याच इतिहासाची पुनरावृत्ती तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात होणार आहे. मात्र भाजपचे कमळ नव्हे, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून संजयकाका पाटील हे स्व. आर आर आबा व विद्यमान आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील या युवा उमेदवारच्या विरोधात उभे ठाकणार आहेत.

रोहित पाटील यांना यापूर्वीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी जाहीर झाले आहे. त्यामुळे बारामतीच्या काका पुतण्यांची जुगलबंदी पुन्हा एकदा कवठेमंकाळच्या मातीत रंगणार आहे. आपल्या कडक भाषणाने अजितदादा संपूर्ण राज्याला परिचित आहेत. संजयकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते स्वतः उपस्थित राहणार असून, यावेळी होणाऱ्या त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


याचवेळी रोहितदादा पाटीलही शक्ती प्रदर्शन करीत आपला तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करीत प्रचाराची तुतारी फुंकणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिग्गज उपस्थित राहणार असून स्वतः शरद पवारही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कवठेमंकाळमध्ये तिसऱ्या शक्तीच्या रूपात असलेल्या अजितराव घोरपडे सरकार यांनी आपले वजन संजयकाकांच्या पारड्यात टाकल्यामुळे या मतदारसंघात मोठी चुरस पहावयास मिळणार आहे. तासगाव कवठेमंकाळ तालुक्यात या दोन्ही बुजुर्ग शक्ती इतकीच रोहित दादा पाटील युवाशक्ती तगडी मांडली जाते. त्यामुळे या लढतीकडे केवळ सांगली जिल्ह्याचेच नव्हे तर ज्याचे लक्ष लागून राहिले आहे.