Sangli Samachar

The Janshakti News

म्हैसाळ-कागवाड रस्त्याची चाळण, मिरज सुधार समितीकडून रस्त्याचा पंचनामा !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ९ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन महत्त्वाच्या राज्यांना जोडणारा म्हैसाळ-कागवाड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर एक फूट खोलीची खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. तर, या खड्ड्यामुळे मिरजेत येणाऱ्या रुग्णांची संख्या सुध्दा घटली आहे. मंगळवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचा पंचनामा करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारला. हा रस्ता तात्काळ करण्याची मागणी केली आहे.

म्हैसाळ-कागवाड हा रस्ता क्र. 160 हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत येतो. दुपदरी रस्ता असल्याने या रस्त्यावर 24 तास वर्दळ असते. मात्र, या रस्त्याच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत अनेक वाहनधारकांनी मिरज सुधार समितीकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, नरेश सातपुते, अभिजित दानेकर, संतोष जेडगे, राकेश तामगावे आदी सदस्यांनी या रस्त्याची पाहणी करीत पंचनामा केला. 

या रस्त्यावरील खड्ड्यांच्या व्हिडिओ क्लिप थेट केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयास पाठवली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूर परिमंडळ अधिकाऱ्यांना जाब विचारला. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.


या मार्गावरील खड्डे चुकवत असताना अनेक छोटे अपघात झाले आहेत, रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना वाहनधारकांमध्ये वादाचे अनेक प्रसंग घडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही तर, मोठ्यात मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे.