yuva MAharashtra आजी माजी खासदारांची तासगाव रिंगरोड श्रेयवादावरून जोरदार वादावादी, दोन्ही नेत्यातील वाद शमवण्यासाठी प्रयत्नांची गरज !

आजी माजी खासदारांची तासगाव रिंगरोड श्रेयवादावरून जोरदार वादावादी, दोन्ही नेत्यातील वाद शमवण्यासाठी प्रयत्नांची गरज !


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. ७ ऑक्टोबर २०२४
विद्यमान खासदार विशालदादा पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यातील वैर संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये निर्माण झालेली दरी 2024 लोकसभा निवडणुकीत अधिकच वाढली. या निवडणूक प्रचारादरम्यान आजी-माजी खासदारांनी एकमेकांवर पराकोटीची टीका केली होती. मात्र हे दोन्ही नेते एकमेकासमोर येऊन टीका झालेली नव्हती. परंतु आज तासगाव येथील नगरपालिकेच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी आजी-माजी खासदार समोरासमोर आल्याने हा वाद उफाळून आला. निमित्त होते रिंग रोडच्या श्रेय वादाचे...

यावेळी आपल्या भाषणात बोलताना खा. विशाल पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्यासमोरच तासगाव मधील रिंगरोडचे श्रेय रोहित पाटील यांना दिले. यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी आपल्या भाषणात खा. विशाल पाटील यांच्या वक्तव्याला जोरदार आक्षेप घेत खा. विशाल पाटील यांच्यावर थेट जोरदार टीका केली. यावेळी खा. विशाल पाटील हे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या दिशेने चाल करून जात असताना माजी खासदार संजय पाटील यांच्या समर्थकांनी त्यांना रोखले. यावेळी आजी-माजी खासदारामध्ये जोरदार शाब्दिक खडाखडी झाली. 


संजय काका पाटील यांची प्रतिक्रिया

तासगाव येथे नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी जो काही तथाकथित वादाचा प्रसंग घडला त्याबाबत माजी खासदार श्री संजय काका पाटील यांनी प्रतिकक्रिया दिलेली आहे ती खालील प्रमाणे..

▪️तासगावच्या रिंग रोड च्या बाबतीत आम्ही गेली दहा वर्ष पाठपुरावा करून रिंग रोडचे काम केले, 173 कोटीचा निधी उपलब्ध करून आणला.
▪️ परंतु काही लोक विकासावर न बोलता श्रेय घेण्यासाठी चमकोगिरी व नौटंकी करण्याचा प्रयत्न करत होती. 
▪️तसेच आमचे राष्ट्रीय नेते गडकरी साहेब यांचे नाव घेवून खोटी व बदनामीकारक वक्तव्ये केली गेली.
▪️त्याबाबतचा जाब उपस्थितांनी विचारला आणि त्यातून गोंधळ निर्माण झाला.
▪️मी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले.
▪️आजच्या तासगाव च्या नगरपालिकेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या येवढ्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा दुर्दैवी प्रकार त्यांनी घडवला.
▪️ तासगावच्या विकसाबाबत मी कटिबद्ध आहे आणि यापुढेही राहीन.

सांगलीचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि आ. सुमनताई पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी धाव घेत संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले व आजी-माजी खासदारांना शांत केले. परंतु आता हा वाद विकोपाला गेल्याने भविष्यात यावरून मोठे रणकंदन माजण्याची चिन्हे दिसून येत आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवादाचे रणकंदन माजल्याने आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही दोन्ही गटात जोरदार खडाखडी झाल्यास नवल वाटायला नको. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांदरम्यान पुन्हा वादावादी होऊन प्रकरण विकोपाला जाऊ नये, यासाठी महायुती आणि महाआघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेण्याची मागणी मतदारसंघात होत आहे. कारण यापूर्वी माजी खासदार संजय काका पाटील व दिवंगत नेते स्व. आर आर पाटील यांच्या गटातील वादाचा परिणाम कार्यकर्त्यांना भोगावा लागला होता. एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. आता त्याची पुनरावृत्ती झाल्यास, तासगाव-कवठे महांकाळ मतदार संघामधील रक्तरंजित निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच, आजी माझी खासदारातील हा वाद शमवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.