yuva MAharashtra सांगलीतील व्यापारी पेठेत स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठीच्या पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास यश !

सांगलीतील व्यापारी पेठेत स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठीच्या पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास यश !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑक्टोबर २०२४
पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची तातडीने सोय करावी यासाठी निदर्शने करुन आंदोलन केले. व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची सोय झालीच पाहिजे, नागरिक, व्यापारी व ग्राहकांच्या मुलभूत गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

सांगली शहरातील बाजारपेठेत गणपती पेठ, सराफ कट्टा, मेन रोड (कापड पेठ), हरभट रोड,दत्त - मारुती रोड, शिवाजी मंडई, फुले मंडई इ. येत असून या सर्व परिसरात मिळून अंदाजे १००० ते १५०० व्यापारी आस्थापना आहेत. यामध्ये बहुसंख्येने महिला कर्मचारी काम करीत असून सदर महिलांना तसेच बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या महिला ग्राहक वर्गाला नैसर्गिक विधीसाठी या एवढ्या मोठ्या भागात एकही महिला स्वच्छतागृह नाही, खरेदीला येणाऱ्या, खाजगी दुकानातील काम करणाऱ्या महिला तसेच महिला भाजी विक्रेत्यांची अत्यंत कुचंबना होत असून, सध्या दिवाळीच्या खरेदी विक्रीच्या निमित्ताने हजारो महिलांचा वावर शहराच्या या भागात होणार असून येणाऱ्या दोन दिवसात तात्पुरते सुसज्ज महिला स्वच्छतागृह उभे करावे व भविष्यात या भागातील जागेचा शोध घेऊन सुलभ शौचालयाच्या धर्तीवर महिला व पुरुषांसाठी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उभी करावीत ही मागणी घेऊन आज शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सराफ कट्टा - कापड पेठ चौकात जोरदार निदर्शने करुन आंदोलन करण्यात आले. 


यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे आग्रही मागणीचे समक्ष निवेदन देण्यात आले. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी व्यापारी पेठेत एकही स्वच्छता गृह नसल्याने महिला व पुरुषांची कुचंबणा होत आहे, नागरिक, व्यापारी व ग्राहक यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे, या भागातील ड्रेनेज, पाणी, लाईट या सुविधाही उपलब्ध करण्यात यावेत. नवीन जागा निश्चित होईपर्यंत मुव्हेबल स्वच्छतागृहे तातडीने उभारण्यात यावेत. याप्रकरणी तातडीने कार्यवाही महापालिका प्रशासनाने करावी अशी अतिरिक्त आयुक्त यांच्यासमोर मागणी केली. अतिरिक्त आयुक्त मा. रविकांत आडसूळ यांनी बाजारपेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची मुव्हेबल स्वरुपात तात्पुरती सोय तातडीने करण्याचे मान्य केले. जागा निश्चित करुन लवकरच कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उभारणीची तजवीज केली जाईल असेही आश्वस्त केले. 


यावेळी आंदोलनात व निवेदन देताना शितल सदलगे, चेतन दडगे, मयूरेश पेडणेकर, नितीन तावदारे, प्रशांत देशमुख, सचिन घेवारे, सुनील व दिपक पिराळे, गोपाळ बलदवा, उमेश बियाणी, विलास खेराडकर, चंद्रकांत मालवणकर, रचना तकटे, अभिषेक बजाज, संजय व आर. व्ही. काळेबेरे, रघुनाथ नार्वेकर, राजन खान व अभिजित रामचंद्रे, ग. र. कुर्णेकर, गुलाबराव खराडे, सिध्दार्थ पेंडुरे, एस. एस. माणिक, शैलेंद्र शिंदे, रमण व विजय सारडा, प्रशांत अहिवळे, गजानन पोतदार, गौरव गायकवाड, हेमंत मोरे, नागराज शेट्टी, सुदर्शन माने, पृथ्वीराज बोंद्रे, विशाल पाटील व गणपती पेठ, कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती मंदिर व दत्त मारुती रोड आणि भाजी मंडईतील व्यापारी, विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.