Sangli Samachar

The Janshakti News

जम्मूतील भाजपाचा पराभव आणि तदनुषंगिक आठवण एका संघ नेत्याची...


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १० ऑक्टोबर २०२४
भारतीय जनसंघाचे आणि नंतरच्या भाजपचे एक खूप ज्येष्ठ नेते होते, जगन्नाथराव जोशी... अत्यंत मिश्किल स्वभाव.

जगन्नाथराव जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन प्रचारक होते... भारतीय जनसंघाला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळत नसत, त्या काळात जगन्नाथराव 'आपण हमखास हरणारी सीट कोणती ?' असे कार्यकर्त्यांना विचारत. आणि त्या जागेवरून आपला उमेदवारी अर्ज भरत. 

प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून निकालाच्या आदल्या रात्रीपर्यंत, 'आपण ही सीट किमान लाखाच्या फरकाने जिंकणार !' म्हणून जगन्नाथराव छातीवर हात ठेवून सांगत. पण, जगन्नाथराव किमान दोन चार लाखाच्या फरकाने ती निवडणूक हरत. मात्र परत आपणच ही सीट पुढच्या वेळी नक्की जिंकणार याची कार्यकर्त्यांना खात्री देत...


आपल्या उमेदवारीचे वर्णन ते जपानी बाहुली म्हणून करत. त्याकाळी एक जपानी बाहुली मिळायची... तिला तुम्ही कशीही पाडलीत तरी ती परत उभी राहायची.

पुढच्या निवडणुकीत जगन्नाथराव परत हमखास हरणाऱ्या सीट वरून उभे राहत. जगन्नाथराव निवडणूक लढवत नव्हते, ते कार्यकर्ते घडवत होते. आपण हमखास हरणार आहोत हे माहीत असूनही... अगदी आपली अनामत रक्कम जप्त होणार आहे हे माहीत असूनही, केवळ ध्येयनिष्ठेने भारतीय जनसंघाचे काम जिद्दीने करणारे हजारो कार्यकर्ते, जगन्नाथरावांनी निवडणूक लढवत लढवत आणि त्या हरत हरत घडवले...

त्याच मुशीतून तयार झालेले नरेंद्र मोदीजी आहेत. जम्मू काश्मीरमध्ये आपण कोणती सीट नक्की हरणार हे कार्यकर्त्यांना विचारून, त्यांनी पहिली सभा तिथेच घेतली. निवडणुका येतील आणि जातील. त्यामध्ये जिंकू किंवा हरू... पण तळागाळातील पक्ष कार्यकर्ता हा महत्त्वाचा असतो, हे संघ प्रचारक म्हणून उभा आडवा देश संघाच्या प्रचारासाठी फिरलेल्या नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याला ठाऊक नसेल का ?... पण हे त्यांच्यावर उठ सूट टिका करणाऱ्या टीकाकारांना मात्र ठाऊक नसावे...