Sangli Samachar

The Janshakti News

शिवछत्रपतींचे विचारच देशाला तारतील, पेठ येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रसंगी संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन !


| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. ११ ऑक्टोबर २०२४
छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचारात देशाला तारू शकतील, आपणाला हिंदुराष्ट्र म्हणून टिकायचे असेल, तर छत्रपतींचे विचारच आचरणात आणले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.

पेठ (ता. वाळवा) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम प्रसंगी संभाजी भिडे गुरुजी बोलत होते. प्रारंभी राजमाता कल्पना राजे भोसले, संभाजी भिडे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. सम्राट महाडिक, उपाध्यक्ष रोहित पाटील, सचिव राहुल पाटील, मीनाक्षीताई महाडिक, सत्यजित देशमुख, ज्येष्ठ नेते सी.बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिल्पकार गजानन तसेच १५ किल्ल्यावरून जल व माती आणणाऱ्या मावळ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना संभाजी भिडे गुरुजी पुढे म्हणाले की, देशातील इतर राज्याकडे पहा, एकता एकरूपता हे नातं प्रत्येक राज्याला आहे. पण खऱ्या अर्थाने देशाचा तोंडावळा आपल्या राज्यात आहे. ही भूमी छत्रपतींच्या जन्माने पावन झाली आहे. हिंदू म्हणून जगायचे असेल तर अन्न, पाणी, निवाऱ्याबरोबरच प्रत्येकाच्या मनात शिवछत्रपतींचे विचार पाहिजेत. 


यावेळी सम्राट महाडिक म्हणाले की, आजचा दिवस सर्वांसाठी सुवर्ण दिवस आहे. आपले स्वप्न साकार होते आहे. याचा आनंद होतो आहे. अनेक तांत्रिक अडचणी व राज्यातील सत्ता बदलामुळे छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम रखडत गेले. लोक वर्गणीतून हा पुतळा उभा राहत आहे. पुतळा उभारण्यासाठी अनेकांचे योगदान लाभले आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो. 

यावेळी बोलताना माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले की, असे वातावरण गावागावात निर्माण झाले पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयात शिवछत्रपतींचे विचार रुजावेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत. 

सकाळच्या सत्रात महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, राजपुरोहित शास्त्री यांच्यासह महेश व उमेश स्वामी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व अभिषेक असा धार्मिक विधी करण्यात आला. शाहीर देवानंद माळी यांच्या पोवाड्याने शिवभक्तांच्या अंगावर शहारे आणले. 

यावेळी डॉ. अभिजीत पाटील, विजयकुमार पाटील, पै. अशोक पाटील, राहुल पाटील, कपिल ओसवाल, केदार नलावडे, जगन्नाथ माळी, जयराज पाटील, शाहूराज पाटील, अजय पाटील, ज्ञानेश्वर पेठकर, शंकर पाटील, रघुनाथ कदम, हर्षदाताई महाडिक, तेजस्वीनीताई महाडिक, विद्याताई पाटील, वसुधा दाभोळे, शकुंतला शेटे, आदी उपस्थित होते. धनपाल माळी यांनी स्वागत केले. प्रा. विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. तर सत्यजित मस्के यांनी आभार मानले.