Sangli Samachar

The Janshakti News

झुक झुक झुक आगीनगाडी.. चिंतामणीनगरचा पूल धुळीच्या लोटा हवेत सोडी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑक्टोबर २०२४
"झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी" हे गाणे ऐकत एक नव्हे तर दोन पिढ्या मोठ्या झाल्या. अजूनही हे गाणे आवडीने ऐकले जाते. परंतु सध्या सांगली परिसरात या गाण्याच्या धरतीवर "झुक झुक झुक आगीनगाडी.. चिंतामणीनगरचा पूल धुळीच्या लोटा हवेत सोडी" ही नवे गाणे प्रचलित होत आहे.

सांगली पुणे रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाच्या पार्श्वभूमीवर माधवनगर मार्गावरील चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाण पूल नूतनीकरणासाठी जमीन दोस्त करण्यात आला. एक वर्षात पूर्ण होणारा हा उड्डाणपूल दुसरे वर्ष पूर्ण होत आले तरी अद्यापही याचे काम अपूर्ण आहे.

या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला विलंब झाल्याने सांगली शहराला जोडणाऱ्या उत्तरेकडील गावांच्या नागरिकांना सांगली शहरात येण्यासाठी द्रविडी प्राणायाम करावा लागत होता. दुचाकी व तीन चाकी वाहने जुन्या बुधगाव रस्त्यावरून, तर मोठी वाहने माधवनगरमधून नांद्रे मार्गाकडे किंवा संजय नगर मार्गे सांगली शहरात वळविण्यात आली होती. याचा प्रचंड मनस्ताप नागरिकांना व प्रवाशांना होत होता.


हा रेल्वे उड्डाणपूल वेळेत पूर्ण व्हावा म्हणून अनेक सामाजिक संघटनांसह सांगलीसह माधवनगर, बुधगाव, कवलापूर या गावातील ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली. अगदी जुन्या पूलाचे वर्ष श्राद्ध ही घालण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित पूलाचा बांधकाम ठेकेदार ढ्ढिम होता. कुणी कितीही दंगा केला तरी पुलाचे बांधकाम कासव गतीने सुरू होते. शेवटी सांगली व माधवनगर परिसरातील व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत माजी आमदार कथा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी हंटरफोड आंदोलन करीत रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला, तर संतोष पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह रेल्वे प्रशासकीय कार्यालयाला कुलूप घालण्याचा इशारा दिला. 

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या अपूर्ण उड्डाणपुलाचा फटका बसू नये म्हणून घाई गडबडीने सुरुवातीस एकेरी तर आता दुहेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र अजूनही या पुलाचे बांधकाम अपूर्ण आहे. रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही त्यामुळे या मार्गावर पसरलेल्या मुरूम व मातीमुळे धुळीचे लोटच्या लोट परिसरात पसरत आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.