Sangli Samachar

The Janshakti News

लाडक्या बहिणी योजनेचा बोजवारा पुन्हा एकदा आला समोर, चक्क काँग्रेस नेत्याच्या खात्यात जमा झाले साडेसात हजार रुपये !


| सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि. १० ऑक्टोबर २०२४
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून राज्यात आरोप प्रत्यारोपाचे रणकंदन माजले असतानाच, प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. ज्या साताऱ्यात एका महाभागाने लाडक्या बहिणी योजनेसाठी वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून तीस अर्ज केले होते, तिथेच हा घोटाळा झाला आहे. आणि तोही एका काँग्रेस नेत्यासोबत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई यांच्या बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पाच हप्त्याचे तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे देसाई यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर कोणी या योजनेसाठी अर्ज केलेला नव्हता. त्यामुळे सरकारने भावालाच भाऊबीजेची उलट ओवाळणी दिली असल्याची टीका होत आहे.

याबाबत आरोप करताना सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले की, पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवून त्या पदाधिकाऱ्याला विकत घेण्याचा शासनाचा डाव आहे. या प्रकारावरून आता महाराष्ट्र शासन आणि प्रशासन पुन्हा एकदा आरोपाच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत.


राज्यातील लाखो बहिणींच्या खात्यात भाऊबीज जमा झाली. परंतु या बहिणींमध्ये अशाही काही आहेत, ज्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे, चार चाकी आहे, ती भगिनी सदन आहे. एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला अनेक गोरगरीब भगिनी या योजनेपासून अद्याप कोसो दूर आहेत. तर काही भगिनींच्या बँक खात्यामधून, ते खाते सक्रिय नसल्याचे सांगत परस्पर पैसे वळते करून घेतले आहेत.

या साऱ्या घटनांमुळे ही चांगली योजना योग्य महिलांपर्यंत न पोचल्यामुळे त्याचा अपेक्षित फायदा महायुतीला मिळणार का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगली येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत लाडकी बहीण तिच्या मैत्रिणीशी बोलताना म्हणाली की, 'मिळतील तेवढे पैसे घ्यायचे, मत मात्र आपल्या हवा त्या पक्षालाच द्यायचे.' यावरून ही योजना किती निष्फळ आहे हेच सिद्ध होते.