Sangli Samachar

The Janshakti News

सांगली बाजार समितीतील मुलाच्या नोकरीमुळे वडिलांचे संचालक पद गेले, सर्वत्र एकच चर्चा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑक्टोबर २०२४
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. रामचंद्र हरी पाटील (रा. इरळी, ता कवठेमंकाळ, जि. सांगली) यांचे संचालक पद काल जिल्हा उपनबंदक श्री. मंगेश सुरवसे यांनी रद्द केले. त्यांचा मुलगा विठ्ठल पाटील हे बाजार समितीमध्ये कायमस्वरूपी नोकरी करीत असल्यामुळे त्यांचे संचालक पद रद्द करण्यात आल्याचे सुरवसे यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे म्हणाले की, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 व नियम 1967 तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नियम 2017 मधील नियम क्रमांक 10 (3) मधील तरतुदीनुसार आपल्याला असलेल्या अधिकारातून तसेच दोन्ही बाजूंच्या व्यक्तीला कडून माहिती घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.


सांगली बाजार समितीचे संचालक रामचंद्र हरी पाटील हे संचालक पदाचा लाभ घेत असताना त्याच संस्थेमध्ये त्यांचा मुलगा विठ्ठल पाटील कायमस्वरूपी नोकरीत आहेत. म्हणूनच रामचंद्र पाटील हे संचालक मंडळावर संचालक म्हणून राहण्यास नियम १० (एच) व नियम 10 (3) अन्वये अपात्र ठरत आहेत. त्यामुळे त्यांचे संचालक पद काल मंगळवारपासून रद्द करण्यात आले आहे.

श्री रामचंद्र पाटील यांनी मागील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता, परंतु त्यावेळी अर्ज भरतानाच सांगली बाजार समितीत मुलगा विठ्ठल पाटील नोकरीत असल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीनुसार त्यांचा अर्ज अपात्र ठरवला होता. पण या निवडणुकीत अर्ज भरल्यानंतर कोणीच हरकत घेतली नव्हती, याचसाठी श्री. रामचंद्र पाटील हे संचालक म्हणून निवडून आले होते. निवडणुकीनंतर आबासाहेब चंदर खांडेकर यांनी यांनी दि. 31 मे 2024 रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती. व श्रीरामचंद्र पाटील यांचे संचालक पद रद्द करण्यासाठी अर्ज केला होता त्यानुसार त्यांचे संचालक पद रद्द करण्यात आल्याची माहिती सुरवसे यांनी दिली आहे. 

त्यामुळे आता रिक्त झालेल्या जागेवर फेर निवडणूक घ्यावी लागणार आहे. रामचंद्र पाटील हे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या गटातील आहेत. आणि निवडणुकीच्या तोंडावर रामचंद्र पाटील यांचे संचालक पद रद्द झाल्याने, घोरपडे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.