| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ७ ऑक्टोबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. एकास एक उमेदवार देण्याचा दोन्ही आघाडी कडून इरादा स्पष्ट करण्यात आला असला तरी, दोन्ही मतदार संघातील संभावित बंडखोरीमुळे महाआघाडी व महायुती समोर उमेदवार निवडीचे आव्हान उभे ठाकले आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील हे गेल्या पाच वर्षात विविध कार्यक्रमातून पेरणी करीत आहेत. त्याला यश येत असतानाच, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी, 'उमेदवारी मिळाली तर काँग्रेस कडून अथवा पुन्हा एकदा सांगली पॅटर्न दाखवून देऊ' असा जणू इशारा दिला आहे. जयश्रीताई पाटील याही गेल्या दोन-तीन महिन्यापासून विविध आंदोलने, जाहीर कार्यक्रम, नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवामधून आता नवरात्रीच्या निमित्ताने त्या महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मिरज विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपाच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्रा. मोहन वनखंडे यांनी जोरदार आव्हान उभे केले. परंतु गेली पंधरा वर्षे मिरज मतदारसंघात केलेल्या दमदार कामगिरीची भाजपकडून दखल घेतली जात नसल्याने, त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला. आता काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाआघाडीकडून इच्छुक असलेले विज्ञान माने यांनी प्रा मोहन वानखंडे यांना उमेदवारी दिल्यास महाआघाडीतील सर्व नाराजांना एकत्र करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरू असा इशारा दिला आहे. माने यांच्या या विधानाला अद्याप महाआघाडीतील नाराज घटकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी आगामी दोन-तीन दिवसात महाआघाडीतील नेते काय भूमिका घेतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
खाडे-वनखंडे-माने यांच्यात उमेदवारीवरून जुंपली असतानाच, मिरज मतदार संघावर दावा सांगितलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी महाआघाडीच्या नेत्यांबरोबरच शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठांनाही इशारा दिला असून, 'जर मिरज विधानसभा मतदारसंघात आम्हाला उमेदवारी मिळाली नाही, तर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक राजीनामा देतील' असे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघात महाआघाडीच्या नेत्यांसमोर धर्मसंकट उभे ठाकले असून हे शिवधनुष्य महाआघाडीतील नेते कशाप्रकारे पेलतात, आणि कोणती भूमिका घेतात यावरच 'बंडोबा थंडोबा होणार' की 'वेगळी चूल मांडतात' हे पहावयास मिळणार आहे.