Sangli Samachar

The Janshakti News

एक वेडी आशा !....(✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ५ ऑक्टोबर २०२४
या एका आठवड्यात दोन पुस्तके वाचली. पहिले पुस्तक गुलजार यांच्या ‘ड्योढी’ या मूळ उर्दू भाषेतील कथासंग्रहाचे अंबरीश मिश्र यांनी केलेले मराठी भाषांतर ‘देवडी’ व दुसरे खुशवंतसिंग यांच्या ‘ट्रेन टू पाकिस्तान’ या इंग्रजी भाषेतील कादंबरीचे त्याच शिर्षकाखाली अनिल किणीकर यांनी केलेले मराठी भाषांतर. देवडीमधील कांही कथा व 'ट्रेन टू पाकिस्तान' या कादंबरीची पार्श्वभूमी पंजाब व सीमा प्रदेशातील, एका हिंदूस्थानची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान असे दोन नवीन देश निर्माण झाले त्यावेळेची. 

ट्रेन टू पाकिस्तानमध्ये दोन्ही देशांच्या सीमेजवळील ‘मनु माजरा’ या कल्पित गांवातील कथानक आहे. शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने गावात राहणारे मुस्लीम व शीख म्हणजे एकमेकांचे सुख-दुःख वाटणारे एक पूर्ण कुटुंबच. देशाच्या फाळणीच्या निमित्ताने उठलेल्या दंगलीची झळ या गावापर्यंत पोहचलेली नसते. यदाकदाचित गावांतील मुस्लीमांच्यावर बाहेरून आलेल्या लोकानी हल्ला केला तर प्रसंगी स्वतःचे रक्त वाहून, जीव देऊन त्यांचे संरक्षण करण्याची हिंदू-शीखांची तयारी. पण हे सुसंवादाचे, एकोप्याचे चित्र पाकिस्तानातून प्रेते भरून येणा-या रेल्वेमुळे आणि त्याचा बदला, सूड उगवणा-या भडक माथ्यांच्या भारतातील शीख, हिंदुमुळे बदलण्यास सुरवात होते. 


मनुमाजरा गावातील एकमेकाच्या गळ्यात पडून उरी भेटी करणारे लोक एकमेकांच्या रक्ताचे पाट वाहण्यास तयार होतात. गावातील गुंड या परिस्थितीचा फायदा उठवतात, लुटालूट करतात व तुटपुंज्या संख्येने असलेले पोलिस हातावर हात ठेऊन उघड्या डोळ्यांनी सर्व पाहत बसण्यापेक्षा कांहीही करू शकत नाहीत.
देश, धर्माच्या नांवाखाली प्रत्यक्षात घडलेल्या लाखो निरापराध हिंदू मुस्लीम तरूण, वृद्ध, बालक, स्त्रीयांच्या हत्यांचे, स्त्रीयांच्यावरील अन्यायांचे, बलात्कारांचे वर्णन माणसांमध्ये असणाऱ्या श्वापदाचे जे भयानक चित्र हे पुस्तक वाचतांना उभा राहते, ते वाचतांना अंगावर शहारे येतात, विचार सुन्न होतात. धर्म, देश यामागील मूळ भावना, उद्देश एकोपा, प्रेम, माणुसकी विसरून माणसाचे राक्षसामध्ये झालेले रूपांतर पाहून मन विचलीत होते, उन्मळून पडते. 


ट्रेन टू पाकिस्तान वाचल्यावर एक सत्य जाणवते, या देशाची फाळणी केल्याने कांही लोकांचा फायदा झालाही असेल पण बहुतांशी लोकांचे, पिढ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसानच झाले आहे. या पार्श्वभूमीवरील कवीमनाच्या, हळव्या, तरल विचारांच्या गुलजारची ‘ड्योढी’ वाचतांना, मन त्यातील पात्रांशी, प्रसंगाशी एकरूप होते. त्यातील सरहद्दीजवळ जाणारा मित्र दुस-या मित्राला विचारतो, 
“हा जो रस्ता आहे ना असाच चालत राहो, कोणी व्हिसा विचारु नये कि पासपोर्ट बघू नये आणि मी पाकिस्तानामध्ये फिरून आलो, तर काय त्या देशाची कोणती लूट मी करणार आहे? शेवटी तो ही माझाच देश आहे. माझी पाळेमुळे तिथे राहिली आहेत आणि फांद्या इकडे आल्या.” 

मन हेलाऊन टाकणा-या अशा संभाषणातून जाणवते प्रदेशांची फाळणी झाली आहे पण, सरहद्दीवरील दोन्ही देशातील सैनिकांपासून ते एकमेकांपासून वेगळे झालेल्या बहिणभावांची, मित्रांची मने अजूनही एकच आहेत. जुन्या आठवणी काढतांना त्यांच्या डोळ्यांमध्ये येणारे अश्रू शब्दांविना नाते सांगत आहेत. देश विभागला गेला आहे पण, सर्वसामान्य लोकांची मने एकमेकापासून वेगळी झालेली नाहीत. 
ट्रेन टू पाकिस्तान व ड्योढी दोन्ही पुस्तकांचे सार समजले आणि माझ्या मनामध्ये एका वेड्या आशेचा किरण उगवला, 

दोन्ही देशातील ही सरकारी भिंत मोडून पडून परत एक वेळ सर्वांना पूर्वीसारखे एकत्र गुण्यागोविंदाने, एकमेकांची सुख-दुःखे वाटत एकोप्याने राहाता येणार नाही कां?
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण