| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० ऑक्टोबर २०२४
वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग. सांगलीच्या शैक्षणिक क्षितिजावर तळपणारा स्वयंप्रकाशित तारा. परंतु आता हा तारा राजकीय महत्त्वाकांच्या फेऱ्यात अडकून काळवंडला जात आहे. शैक्षणिक स्वायत्तता असलेल्या या महाविद्यालयाची सध्या प्रत्येक पायरीवर अडवणूक करण्याचे धोरण प्रशासनाच्या आडून राजकारणातील शिखंडी करीत आहेत. या प्रकारामुळे विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणारी तंत्रज्ञानाची नवी पिढी घडविणारे हे महाविद्यालय आणि महाविद्यालयाचे प्रशासन वैतागले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर राज्य-देश पातळीवर किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवरील वालचंद महाविद्यालयाचे त्याची आहे. या महाविद्यालयात शिकलेले अनेक विद्यार्थी हे देशाच्या विकासात महत्त्वाचे भूमिका बजावत आहेत. असे असूनही महाविद्यालयाचे महत्त्व जाणणारे राजकारणी या महाविद्यालयाच्या विकासात आडवे येत आहेत हे दुर्दैव म्हणावे लागेल.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश नव्या पर्वत प्रवेश करीत असतानाच 1947 साली या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. राज्यात खाजगी महाविद्यालयांना परवानगी देण्याचे धोरण अंमलात येण्यापूर्वी आर्थिक अडचणीत असलेल्या या महाविद्यालयाला, दानशूर व्यक्तिमत्व शेठ वालचंद हिराचंद यांनी आर्थिक हात दिला, आणि हे महाविद्यालय पुन्हा एकदा नवे तंत्रज्ञ घडवण्यास सज्ज झाले. मात्र आता पुन्हा एकदा आर्थिक नव्हे तर राजकीय हितसंबंध हे या महाविद्यालयाच्या मुळावर उठले आहेत.
एकीकडे स्थापनेपासूनच स्वतःचा एक उच्च दर्जा टिकवून ठेवणाऱ्या या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून किंबहुना देशभरातून विद्यार्थ्यांचे प्राथमिकता असते. या महाविद्यालयात एकापेक्षा एक सरस प्राध्यापक असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पूर्वीपासूनच ही परंपरा सुद्धा आजतागायत अबाधित आहे. एकीकडे हे चित्र असताना, दुसरीकडे महाविद्यालयावर ताबा मिळवण्याच्या चढाओढीत अभियंत्यांच्या अनेक वेड्या घडवणाऱ्या या महाविद्यालयाकडे अडचणीचे डोंगर उभे करण्यात येत आहेत.
महाविद्यालयाला शैक्षणिक स्वायत्तता आहे. नवे अभ्यासक्रम सुरू करणे, शैक्षणिक निर्णय घेणे याबाबतचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी अधिकाधिक महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याकडे शासनाचा कल आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही महाविद्यालयांनी कालसुसंगत अभ्यासक्रम सुरू करावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. असे असताना दर्जाच्या पातळीवर सर्व निकष पूर्ण करूनही वालचंद महाविद्यालयाबाबत तंत्रशिक्षण विभागाकडून दुजाभाव केला जात आहे. नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जाचक अटी लादल्या आहेत.
महाविद्यालय शासकीय अनुदानित आहे. म्हणजेच तेथील प्राध्यापक, कर्मचारी यांचे वेतन शासनाकडून दिले जाते. मात्र नवे अभ्यासक्रम सुरू करायचे तर स्वतंत्र महाविद्यालयच सुरू करा असा तंत्रशिक्षण विभागाचा सूर आहे. इतर कोणत्याही स्वायत्त संस्थेला न घातलेली अट वालचंद महाविद्यालयाला घालण्यात आली आहे. महाविद्यालयासाठी दरवर्षी वालचंद ग्रुपकडून खर्च करण्यात येत असून नवे अभ्यासक्रम सुरू करायचे तर आता असलेल्या सुविधांपैकी काहीच वापरायचे नाही, अशी अजब अट तंत्रशिक्षण संचालनालयाने घातली आहे. नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव देऊनही तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर महाविद्यालयाने उच्च न्यायालयात धाव घेऊन परवानगी मिळवली. मात्र त्यानंतरही अनेक दिवस अभ्यासक्रमांना परवानगी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला नाही व जो निर्णय काढला, त्यात जाचक अटी लादण्यात आल्या आहेत.
या साऱ्या प्रकारामुळे या महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र कारणापासून अलिप्त ठेवून सांगलीची ओळख असलेले हे महाविद्यालय पूर्वीप्रमाणेच आपली स्वायत्तता जपण्यासाठी स्वतंत्र असावे अशी मागणी केली जात आहे.