| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑक्टोबर २०२४
आमदार व्हावे ही प्रत्येक राजकारण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. कधी विकास कामातून, कधी कार्यकर्त्यांच्या बळावर तर कधी संपत्तीच्या जोरावर सत्तेचा सोपान अनेक जण चढत असतात. अशी अनेक उदाहरणे आज समाजासमोर आहेत. मात्र या समजाला छेद देत सांगली विधानसभा मतदारसंघात सध्या, श्रीमती जयश्रीताई पाटील व श्री. शिवाजी तथा पप्पू डोंगरे या दोन दिग्गजांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःचे स्थान निर्माण करून, महाआघाडी व महायुती समोरच नव्हे तर, मतदारांसमोरही 'नेमके कोण ?' हे मोठ्ठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
श्रीमती जयश्रीताई पाटील यांचा सोज्वळ व घरंदाज चेहरा समाजाला भावतो आहे. कोणत्याही कटू किंवा कपटी राजकारणाचा आसरा न घेता, केवळ स्व. मदनभाऊ पाटील यांच्या सुविद्य पत्नी ही ओळख न ठेवता, त्यांनी विविध पदांच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले आहे. 2019 साली त्यांनी काँग्रेस पक्षाकडे मागितलेली सांगली विधानसभा मतदार संघातील उमेदवारी, उभरते तरुण नेतृत्व श्री. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्यासाठी माघार घेऊन मोठ्या मनाने आपल्याला मिळालेल्या संधीवर पाणी सोडले होते.
त्यानंतर कोठेही प्रत्यक्ष समोर न येता मदन भाऊ पाटील युवा मंच कार्यकर्त्यांच्या व आपल्या गटाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर 2024 च्या या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र पुन्हा एकदा श्री. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी उमेदवारीवर हक्क सांगितल्याने, श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी 'आत्ता नाही तर कधीच नाही' हा धोका ओळखून त्यांच्या उमेदवारीसाठी एल्गार पुकारला.
काँग्रेस पक्षाने श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या ऐवजी पुन्हा एकदा श्री. पृथ्वीराजबाबा पाटील यांचे नाव विधानसभेसाठी निश्चित केल्यानंतर, जयश्रीताई पाटील यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवणारे व पक्षाचा आदेश मानून 2019 साली विधानसभा निवडणुकीतून स्वखुशीने माघार घेतलेले श्री. शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी 2024 च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडे मागितलेली उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे.
शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून केलेली विकास करणे असो किंवा भाविकांना प्रतिवर्षी स्वखर्चाने यात्रेसाठी घेऊन जाणे असो. समाजात त्यांच्याबाबत एक प्रकारची आदरयुक्त भावना आहे. श्री. उर्फ पप्पू डोंगरे यांच्याकडे तरुण कार्यकर्त्यांचा असलेला मोठा संच आणि मतदारांची असलेली सद्भावना ही त्यांची जमेची बाजू आहे.
श्रीमती जयश्रीताई पाटील असो किंवा श्री. शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे या दोघांनीही निवडणुकीत बंडखोरीच्या माध्यमातून आव्हान पुढे केले आहे. समाजात त्यांची असलेली ओळख आणि कार्य यामुळे काँग्रेस व भाजपासमोर हे वादळ कसे रोखायचे असा प्रश्न उभा ठाकला आहे. यातून काँग्रेस व भाजपाचे पक्ष श्रेष्ठी, काय व कसा मार्ग काढतात यावरच निवडणुकीतील पुढील गणित राहणार आहे.