Sangli Samachar

The Janshakti News

मा. शरद पवारांच्या आरक्षणावरील मर्यादा 75 टक्के वाढविण्याच्या वक्तव्याला जरांगेचे प्रत्युत्तर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑक्टोबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मा. शरद पवार यांनी आरक्षणावरून एक गुगली टाकली आहे. सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली तर, मराठा समाजासह ज्यांना आरक्षण मिळाले नाही त्यांचाही यामध्ये समावेश करता येईल. मा. शरद पवार यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्र शासनाचे गोची झाली आहे. ही मागणी मान्य करावी तर क्रेडिट मा. पवारांना जाईल. आणि नाही केली तर महाराष्ट्र शासन आरक्षणा विरोधात आहे असा संदेश समाजात जाईल. अशा दुहेरी कात्रीत महाराष्ट्र शासन सापडले आहे. 

मात्र आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झालेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र मा. शरद पवार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. "लोकांना वेड्यात काढण्याचे काम ते करत आहेत. आधी बोलले असते तर हा प्रश्न मार्गी लागला असता. मराठा समाजासाठी कोणी काय मागणी केली काय नाही केली, यापेक्षा आधी मराठा समाजाला 50% च्या आत ओबीसी आरक्षणामध्ये सामावून घ्यावे त्यानंतर तुम्हाला मर्यादा शंभर टक्के का दीडशे टक्के वाढवायचे आहेत तेवढे वाढवा. त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.


ही सर्व बहाणेबाजी आहे. त्यांना समाजाला फसवायचे, दिशाभूल करायची मराठ्यांना मार्ग वेगळा दाखवायचा, सहानुभूती दाखवायची. पण हा प्रकार दिसतो तसा नाही तुम्हाला आधी आरक्षण द्यावे लागेल त्यानंतर मर्यादा वाढवायची की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा असं सांगून जरांगे पाटील म्हणाले की, समाजाला उगाच आशेला लावू नका. आम्ही मर्यादा वाढवतोय आणि आरक्षणात घालतोय ही आशा मला नकोय आधी आम्हाला आरक्षणात घाला, चॉकलेट दाखवणे बंद करा. सत्ताधारी असोत किंवा महाविकास आघाडी सर्वच मराठ्यांकडून फायदा करून घेत आहेत. त्यामुळे आधी 50% च्या आत मध्ये घ्या पण नादी लावू नका. निवडणुका होईपर्यंत किंवा मराठ्यांचा फायदा करून घेईपर्यंत, विरोधी पक्षाने पण आणि सत्ताधाऱ्यांनीही हा नवीन डाव आखलेला दिसतोय, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, जनतेला खुश करण्यासाठी हे सर्व शब्द वापरून नका. यापूर्वी बैठका झाल्या तेव्हा हा विषय काढायचा ना ? आता निवडणुकीच्या तोंडावर विषय काढून लोकांना काय नादी लावताय ? महायुती असो किंवा महाविकास आघाडी हे दोन्ही एकच आहेत. आता आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर हा विषय निवडणुका होईपर्यंत मागे पडेल. दोघांनाही मराठा समाजाला खेळवत ठेवायचे आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मात्र शरद पवार यांच्या वक्तव्यावरून महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या मात्र. शरद पवार व जरांगे पाटील यांचे जुंपली आहे. त्या वादात न पडता दूर राहून हा विषय कसा टाळता येईल हेच महायुतीला हवे आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्री असो किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री अथवा महायुतीचा वरिष्ठ नेता, सर्वांनीच मा. शरद पवार यांच्या विधानावर चुप्पी साधली आहे.