| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. ११ ऑक्टोबर २०२४
'विठू माऊली म्हणजे प्रत्यक्ष बालाजीचे प्रतिरूप' असाच माऊली भक्तांचा ठाम विश्वास व श्रद्धा... आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या भाविक बालाजीच्या दर्शनाला जातो तेव्हा तो हमखास पंढरपुरातील विठू माऊली समोर नतमस्तक व्हायला येतो... परंतु आता या विठू माऊलीच्या देवळातून बालाजी मंदिर हटवण्यात आल्याने भाविकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. धीमे गतीने सुरू असलेल्या बांधकामाबाबत भाविकातून टीका होत असतानाच, आता विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी समोरील बालाजीचे पुरातन दगडी मंदिर हटवण्यात आल्याने याबाबत भक्तातून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, विठ्ठल मंदिरातील बालाजीचे मंदिर हटवण्यात आल्याची माहिती नाही. जर हे मंदिर हटवले असेल तर तो मंदिरातील कामाचा भाग आहे. काम संथ गतीने चालू आहे हे बरोबर असले तरी, त्या ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात येणार आहे. या संदर्भात मंदिर समितीची बैठक होणार आहे बैठकीत संबंधित ठेकेदाराला काम वेळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येणार आहे असेही गहनीनाथ महाराज औसेकर यांनी म्हटले आहे.
यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनीही बालाजी मंदिर हटवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. किमान मंदिर हटवण्यापूर्वी वारकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. परंतु तसे न करता मनमानी पद्धतीने बालाजीचे मंदिर हटवले गेले आहे. या संदर्भात मंदिर समितीने लेखी खुलासा करावा, अशी मागणी हे विठ्ठल पाटील यांनी केली आहे.
दरम्यान पंढरपुरातील एक नवा रोड समोर आला असून, पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भक्तांसाठी उभारण्यात आलेल्या भक्तनिवासालाच सायबर गुन्हेगारांनी टार्गेट केले आहे. पंढरपुरातील भक्तनिवासासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जाते.
www.yatradham.org या संकेतस्थळावरून 'ऑनलाईन' सुविधा उपलब्ध आहे. 'ऑफलाईन' पद्धतीने प्रत्यक्ष येऊन नोंदणी सुविधा उपलब्ध आहे. मात्र श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाच्या नावाने www.Shrivitthalrukminibhaktnivas.in अशा खोट्या संकेतस्थळावरून भक्तांकडून निवासाची आगाऊ नोंदणी केल्या जात आहेत. ज्यामुळे भाविकांची आर्थिक फसवणूक असल्याचे कळते, अशी माहिती मंदिर समितीने दिली आहे. याबाबत मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. या बातमीने राज्यभरात खळबळ माजली आहे.