Sangli Samachar

The Janshakti News

वीराचार्य कुचनुरे यांच्या 70 व्या जयंती निमित्त वीराचार्य पतसंस्थेतर्फे जयपूर फूट चे वाटप !


| सांगली समाचार वृत्त |
मालगांव - दि. २२ ऑक्टोबर २०२४
मालगाव - प्रथितयश वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्थेमधील सर्व ठेवी १०० % सुरक्षित आहेत कारण संस्थेने वीराचार्याच्या कार्याचा वारसा जपत त्यांचा कार्यवारसा व विचार वारसा पुढे सुरू ठेवला असल्याचे गौरवोद्‌गार शशिकांत राजोबा यांनी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या ७० व्या जन्म जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना काढले. मिरज तालुक्यातील मालगाव येथे वीराचार्य जयंतीनिमीत्त जयपूर फूट (कृत्रिम पाय) चे वितरण, व मालगांव येथील ग्राहकांचा मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी मुख्य समारंभात व्हा. चेअरमन अरूण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करणेत आले. यानंतर सभेचे प्रास्ताविक चेअरमन अजितकुमार भंडे यांनी केले. यामध्ये वीराचार्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगावर प्रकाशझोत टाकत, वीर सेवा दलाचे माध्यमातून युवकांना संघटित करून त्यांना वीराचार्यांच्या विचाराने प्रेरीत करण्याचे कार्य निरंतर सुरू असलेचे सांगितले. संस्थेच्या कार्याची माहिती व सहकारी पतसंस्था चळवळ अधिक सदृढ होणेसाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत शशिकांत राजोबा यांनी माहिती दिली. 


सहकारी पतसंस्था चळवळ संक्रमण काळातून मार्गक्रमण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर वीराचार्य पतसंस्थेने सुक्ष्मतम विचार करून केलेल्या गुंतवणूक, सुरक्षित कर्जवितरण, स्ववास्तूमधील शाखा यामुळे संस्थेच्या १००% ठेवी सुरक्षित असल्याचे सांगितले. वीराचार्य पतसंस्थेने समाजातील सामान्यांना सवलतीच्या दरात अर्थ सुविधा, अडचणीतील पतसंस्थांचे विलीनीकरण, अपंगाना जयपूर फूटचे वितरण करून वीराचार्यांचे विचार पुढे चालविणेचे कार्य केल्याचे सांगितले. 

यावेळी प्रमुख पाहुणे मा. डॉ. विजय पाटील यांनी सहकारामध्ये सामाजिक काम करणारी संस्था म्हणून वीराचार्य पतसंस्थेचे कार्य अग्रेसर असल्याचे सांगितले. मा. विश्वास खांडेकर यांनी वीराचार्य पतसंस्था पारदर्शक कारभारासाठी प्रसिध्द असलेचे दिसून आले असून, आजच्या ग्राहक मेळाव्यामुळे संस्था अधिक समजून घेता आली असे गौरवोद्वार काढले. 

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. काकासाहेब धामणे यांनी शेतकरी आणि शेती व्यवस्था अडचणीत आल्याचे सांगून यासाठी वीराचार्य पतसंस्था आधारवड ठरत असलेचे नमूद करून वीराचार्यने आपल्या सामाजिक उपक्रमाने, उत्कृष्ट ग्राहक सेवेने, संचालकांच्या धोरणात्मक निर्णयाने दमदार वाटचाल सुरू ठेवली असल्याचे सांगितले. 

यावेळी ६ अपंग बांधवाना जयपूर फूटचे वितरण करणेत आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक प्रकाश सांगावे यांनी केले. यावेळी मालगांव व परिसरातील मान्यवर, निमंत्रित मालगांवचे सरपंच मा. अनिता क्षिरसागर, मा. विजय आवटी, मा. शितल खोलकुंबे, मा. सुरेश शिंदे, मा. किरण चौगुले यांचेसह उद्योग व्यापारी, ग्राहक सभासद, संस्थेचे संचालक, सर्वश्री महावीर कुचनुरे, एन. जे. पाटील, अरूण कुदळे, मोहन नवले, डी. के. पाटील, सुरेश चौगुले, महावीर बा. पाटील, महावीर आ. पाटील, जे. जे. पाटील, मोहन लांडे, सुनिल कोगनोळे, डॉ. सुरेंद्र ठिकणे, भुपाल मगदूम, अनिल हवाणे, शितल सावळवाडे, अनंतसागर गोरवाडे, व्यवस्थापक शितल मसुटगे यांचेसह सर्व सेवकवर्ग व रोटरी क्लब व उषा मोहिनी विकलांग पुनर्वसन केंद्र सांगलीचे रामकृष्ण चितळे, बजाज व माळी यांचेसह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.