Sangli Samachar

The Janshakti News

दहावी परीक्षेत गणित, विज्ञानात 35 पेक्षा कमी मार्क मिळाले तरीही पास; शिक्षण क्षेत्रातून महामंडळाला नाराजीचे मार्क्स !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ ऑक्टोबर २०२४
परीक्षा म्हटलं की भल्या भल्यांची भांबेरी उडते. मग ज्यांचे गणित आणि विज्ञान विषय कच्चे आहेत, त्यांना भोपळा ठरलेला. तर काहीजण 35 टक्के जिंदाबाद मधील... आणि या दोन विषयात झाल्याने म्हणूनच अनुत्तिर्णांची संख्या अधिक... आणि म्हणूनच शिक्षण महामंडळाने या दोन्ही विषयात किमान 20 गुण मिळाले तरी अकरावीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अर्थात त्यांच्या निकालावर एक विशिष्ट शेरा येणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय असणार आहेत पहिले म्हणजे असे विशिष्ट शेरा असलेले प्रमाणपत्र घेऊन अकरावी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे. या नियमाचा फायदा ज्यांना गणित व विज्ञान घेऊन आपले शैक्षणिक करिअर घडवायचे नाही, अशा विद्यार्थ्यांना होणार आहे.

मात्र महामंडळाच्या या निर्णया विरोधात शिक्षण क्षेत्रातून जोरदार टीका होत आहे. महामंडळाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घातक ठरणारा आहे. कारण या पुढील काळ हा केवळ तंत्रज्ञानाच्या आधारे नोकऱ्या मिळणारा असेल. महामंडळाने घेतलेला हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला हे समजायला मार्ग नाही. याबाबत आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले की "सरकारला फक्त परीक्षा सोप्या करून निकाल वाढवायचे असतील तर जन्मदाखल्याबरोबरच पदवीचे प्रमाणपत्र द्यावे."


सांगलीतील शिक्षण क्षेत्रातील काही तज्ञांशी संपर्क साधला असता, याबाबत शासनाकडून अधिकृत माहिती जाहीर झाल्या नसल्यामुळे, काही प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही असे म्हटले आहे. मात्र जर असा निर्णय घेतला असेल तर तो विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षण संस्थांच्याही फायद्याचा असणार नाही, अशी मते व्यक्त होत आहेत. 

विज्ञान विषयामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विशाल होतो तर गणितामुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती वाढत असते. त्यामुळे हे दोन विषय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाशी निगडित आहेत. आणि म्हणूनच मार्गांशी खेळ करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे सर्वंकष ज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जे कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केली आहे.

आता शिक्षण क्षेत्रातील नामवंतांचा विरोध पाहून हा अजब निर्णय महामंडळ बदलते की आपल्या निर्णयावर ठाम राहते, यावरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि व्यक्तिमत्व विकास अवलंबून राहणार आहे.