Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा करीत श्रीमती जयश्रीताई पाटील 29 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ ऑक्टोबर २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघ आता लोकसभेप्रमाणेच हाय होल्टेज मतदार संघ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी मंत्री व काँग्रेसचे जिल्ह्यातील तकडे नेतृत्व समजले जाणारे स्व. मदनभाऊ पाटील यांचा गट अजूनही बलाढ्य आहे. लोकसभा निवडणुकीत याची चुणूक पहावयास मिळाली. आता हा गट श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. आणि याच मदन भाऊ पाटील गटाच्या ताकदीवर श्रीमती जयश्रीताई पाटील या काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त करून सांगली विधानसभा मतदारसंघात आपली उमेदवारी शनिवारी दाखल करणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाआघाडीत बंडखोरी करून निवडणूक रिंगणात उतरलेल्या विशाल पाटील यांच्या पाठीशी जयश्रीताई पाटील या ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. महिला आघाडीची एक बाजू त्यांनी खंबीरपणे पेलली होती. त्याचवेळी त्यांनी आपण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले होते.


काल मदन भाऊ व जयश्रीताई पाटील समर्थकांच्या झालेल्या बैठकीत जयश्रीताई पाटील यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली. गेले महिनावर सांगली विधानसभा मतदारसंघात जयश्रीताई बंडखोरी करणार की काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक रिंगणात उतरणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता पक्षाने आपल्याला कामाला लागण्याचे आदेश दिले असून संध्याकाळपर्यंत आपली उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास जयश्रीताईंनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे आता सांगलीत सुधीरदादा गाडगीळ यांच्या विरोधात जयश्रीताई पाटील विरुद्ध पृथ्वीराजबाबा पाटील असा तिरंगी सामना होणार असून, यामध्ये नेमके कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतरच दिसून येईल.