yuva MAharashtra महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक, उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार अवघे पंधरा दिवस !

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक, उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार अवघे पंधरा दिवस !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ ऑक्टोबर २०२४
होणार होणार म्हणून गाजत असलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी काल एका पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक जाहीर झाले असले तरी अद्यापही महायुती अथवा महाआघाडी कडून अधिकृत रित्या उमेदवारांचे यादी जाहीर झालेली नाही. महायुती आणि महाआघाडी दोन्हीकडे इच्छुक उमेदवारांचे संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने, तसेच काही ठिकाणी जागा वाटपाबाबत मतभेद असल्याने ही यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे.

महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. यामध्ये 234 सर्वसाधारण मतदारसंघ असून, 25 मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी, तर 29 मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. असे सांगून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक मतदार केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी विविध ठिकाणी पथकाद्वारे तपासणी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना स्वतःबाबत तीन वेळा वृत्तपत्रातून जाहिरातीद्वारे माहिती द्यावी लागणार आहे. असे राजीव कुमार म्हणाले.


दरम्यान राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये छोटी नंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीत भाजपा तर महाआघाडीत काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका बजावणार असून त्यांच्या वाट्याला अधिक जागा येणार आहेत. महायुतीत शिंदे गटाला दुसऱ्या क्रमांकावर तर अजित दादा पवार गटाला तिसऱ्या क्रमांकावर जागा मिळण्याचे संकेत आहेत. तर महाआघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेसला त्या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाला, त्या पाठोपाठ शरद पवार गटाला जागावाटप होणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघ हायव्होल्टेज असून येथील लढतीकडे केवळ राज्याचेच नव्हे तर देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक निकालानंतर विधानसभेवर महायुती आपली सत्ता अबाधित राखणार की सत्तांतर होऊन महाआघाडी सत्तारूढ होणार याबाबत सर्वत्र उत्सुकता लागून राहिली आहे.