yuva MAharashtra हायवेवरून प्रवास करताना तुमचे पेट्रोल संपले किंवा तुम्हाला काही समस्या आली तर ?... काळजी करू नका, या नंबरशी संपर्क साधा !

हायवेवरून प्रवास करताना तुमचे पेट्रोल संपले किंवा तुम्हाला काही समस्या आली तर ?... काळजी करू नका, या नंबरशी संपर्क साधा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ सप्टेंबर २०२४
गेल्या काही वर्षात आधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या हायवेवरून प्रवास करताना, आपल्याला जलद आणि आरामदायी प्रवास करता येतो. अर्थात काही हायवेला 'हायवे का म्हणायचे ?' हा प्रश्न पडतो... असो, हायवेवरून प्रवास करताना कदाचित आपल्या गाडीतील पेट्रोल संपते. किंवा गाडी बंद पडते. अशा वेळेला या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर गाड्या आपल्या मदतीसाठी थांबतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे आपल्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

पण तुम्हाला ठाऊक आहे का ? अशा वेळेला हायवे ऑथॅरिटीकडून आपल्याला विनामूल्य मदत मिळू शकते. यासाठी खालील पोस्ट आणि नंबर्स उपयोगाचे ठरू शकतात. आपल्याला संकटकाळी मदत हवी असेल तर तुम्ही टोल प्लाझा ओलांडल्यानंतर, तुम्हाला टोल भरण्याची स्लिप दिली जाते. त्यावर आपत्कालीन नंबर असतो... या नंबर वर कॉल केल्यास पंधरा मिनिटात तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जर तुमचे पेट्रोल संपले असेल, तर 1033 या क्रमांकावर कॉल केल्यास तुम्हाला पाच ते दहा लिटर पेट्रोल मिळू शकते. अर्थात यासाठी पेट्रोलचे पैसे मात्र द्यावे लागतील. जर तुमची गाडी बंद पडली असेल तर क्रेनने तुमची गाडी जवळच्या सेवा केंद्रात नेऊन तुम्हाला, मेकॅनिकची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. 


तुमच्या मोबाईलला रेंज नसेल तर रस्त्याच्या कडेला असलेल्या आपत्कालीन बूथचा तुम्ही वापर करू शकता. तुमच्यापैकी कुणाची तब्येत बिघडली असेल तरीही, नॅशनल हायवे अथॉरिटी कडून 8577051000 किंवा 7237999911 या क्रमांकावर कॉल केल्यास तुम्हाला वैद्यकीय सेवा ही मिळू शकते.

ड्रायव्हिंग करीत असताना तुम्हाला जर थकवा जाणवू लागला किंवा विश्रांतीची गरज असेल तर हायवेच्या शेजारी असलेल्या ढाब्यावर, विशेषतः टोल नाक्यावर तुम्ही आपली गाडी साईडला घेऊन विश्रांती घेऊ शकता. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे आता यापुढे आरामदायी प्रवास करीत असतानाच जर वरील प्रमाणे काही आपत्ती आली तर तुम्ही अशा पद्धतीने विनामूल्य सेवा मिळवू शकता.