Sangli Samachar

The Janshakti News

जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र... न चुकता वाचावी अशी पोस्ट आणि पहावा असा व्हिडिओ !...


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २४ सप्टेंबर २०२४
साधारण 12-13 वर्षांपूर्वी "मुलगी वाचवा" हि मध्यवर्ती कल्पना घेऊन मी त्यावर काम करत असे. यानिमित्ताने अनेक पालकांशी भेटी झाल्या, डॉक्टरांशी चर्चा घडल्या, या विषयात आधीपासून काम करणाऱ्या तज्ज्ञांशी संवाद झाले. या सर्व मंडळींना काय वाटतं; याविषयी मला हळूहळू समजायला लागलं. 

मुलगाच हवा, या हट्टा पायी अनेक मुलींना आयुष्यातूनच हद्दपार केलं जातं... या न जन्मलेल्या एखाद्या मुलीशी मला संवाद साधता आला तर ? 

मुलगी बाबांच्या खूप जवळची असते, या न जन्मलेल्या एखाद्या मुलीला आपल्या बाबांशी बोलायची संधी मिळाली तर ? ती काय बोलेल ?? कसा संवाद साधेल ??? वगैरे... वगैरे... या विचारांनी मला पछाडलं... ! 

डोक्यात सतत तेच विचार... सततच्या या विचारांमुळे ती न जन्मलेली मुलगी मीच आहे; असंही मला खूपदा वाटायला लागलं... इतका मी तिच्याशी एकरूप झालो. 

मग ती आपल्या बाबांशी काय बोलेल ? कशी बोलेल ? बाबांना कशी लाडीगोडी लावेल ?? तिचे संवाद मीच बोलू लागलो... आणि मग माझ्याही नकळतपणे; त्या जन्माला न आलेल्या मुलीचे स्वगत मी त्यावेळी कागदावर उतरून काढलं... 

तेच हे... जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र... !

या पत्राला न भूतो न भविष्यती असा माझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला... शेकडो फोन कॉल्समुळे भंडावून गेलो... अनेकांनी यावर शॉर्ट फिल्म केल्या, नाटकं केली, पथनाट्य सादर केली, ऑडिओ रूपांतरण केले... खरं समाधान मला दोन गोष्टींचे झाले...


एक म्हणजे महाराष्ट्र शासनाने, याच्या हजारो प्रती छापून घेतल्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आणि समाजातील अनेक मंडळी यांच्यामध्ये या प्रती वाटल्या. सरकारी दवाखान्यात भिंतीवर हि प्रत लावणे बंधनकारक केले. यामुळे थोडं फार तरी समाज प्रबोधन नक्कीच झालं असावं. 

कदाचित याचाच एक भाग म्हणून किमान 100 पालकांचे मला रडत रडत फोन आले, 'आधीच्या चार सहा पोरीच आहेत आम्हाला, आता यावेळी सुद्धा कदाचित मुलगीच जन्माला येईल या भीतीने आम्ही गर्भपातच करणार होतो; परंतु हे सर्व वाचल्यानंतर आम्ही आमचा निर्णय बदलला आहे. यावेळी मुलगी जन्माला आली तर आम्ही जल्लोषात तिचं स्वागत करू' त्यांचे हे शब्द ऐकल्यानंतर अत्यानंदाने मीही रडलो होतो. 

यानंतर मध्ये काही वर्षे गेली, पुढे मी भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करायला सुरुवात केली आणि त्याच कामात व्यस्त झालो; आणि आपोआपच हा विषय मागे पडला. पुढे 2021 साली जुन्या फायली चाळत असताना, या लेखाची प्रत पुन्हा एकदा माझ्या हातात आली. एकदा, दोनदा, 50 वेळा, 100 वेळा मी तो लेख वाचला आणि तितक्याच वेळा रडलो. कितीतरी दिवस शर्टच्या खिशात घडी करून मी तो लेख छातीशी लावून काम करायचो... ते ही माझं बाळच होतं ना ? 

घडी पडून चुरगळलेला कागद तो... 
पुन्हा एकदा शब्दबद्ध करून, त्याची व्यवस्थित प्रिंट काढावी, या भावनेने मी तो लेख पुन्हा शब्दबद्ध केला आणि पुन्हा आपल्यासारख्या सहृदय व्यक्तींना तो पाठवला. 

पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती.... 

प्रचंड फोन कॉल्स, व्हाट्सअप मेसेज, टेक्स्ट मेसेज याद्वारे प्रचंड म्हणजे प्रचंड कौतुक झालं ! याहीवेळी अनेकांनी यावर ऑडिओ केले. याच काळात श्री दत्ताजी सरदेशमुख सर यांच्याशी स्नेह जुळला. 

सरदेशमुख सर हे आकाशवाणी वरील जेष्ठ निवेदक... ! आवाजाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सरदेशमुख सरांचे नाव माहित नाही; असा माणूस सापडणे दुर्मिळ ! एक अभिजात कलावंत... !!! 

आवाजाला सुद्धा किती छटा आणि रंग असतात, हे "पहायचं" असेल तर सरदेशमुख साहेबांना "ऐकावं" लागेल...!!! सरदेशमुख सरांचा आवाज मला कधी काळया पाषाणासारखा अभेद्य वाटतो... तर कधी बंदा रुपया फरशीवर पडल्यानंतर जो टणत्कार निर्माण होतो, त्या सम भासतो... कधी हाच आवाज ढोलकीची थाप होऊन; आपल्या हृदयावर थापडा मारतो....

तर कधी आशाबाईंचा तरल आवाज होऊन, मनात रुंजी घालतो... कधी मधुर बासरी होऊन मान डोलवायला भाग पाडतो... हाच आवाज कधी उन्माद भरलेला प्रचंड ढोल होतो... 

सरदेशमुख साहेबांबद्दल काय सांगू ? किती सांगू ?? कसं सांगू ?? तर हा लेख वाचून; त्यांनी 2021 साली मला फोन केला आणि विचारले, "मी याचे अभिवाचन करू का ? आपली परवानगी असेल तर याचे ऑडिओ रूपांतर माझ्या आवाजात करू का ??"

माझी कुठलीही परवानगी तर सोडाच; परंतु मला साधं न कळवताही अनेक लोक (काही सन्माननीय अपवाद वगळून) लेख कॉपी करतात, स्वतःच्या नावानिशी फॉरवर्ड करतात, नाटक करतात, त्यावर बक्षीस मिळवतात, शॉट फिल्म करतात, लेखनासाठी लेखक म्हणून प्रथम पारितोषिक सुद्धा घेतात...! 

अशांना मला सांगायचं आहे "नुसते लेख नका कॉपी करू... माझं काम सुद्धा थोडंफार कॉपी करा..."

असो, असं असतानाही; इतका मोठा माणूस, आपली परवानगी मागतो आहे, याचं अप्रूप वाटलं, त्यांचं कौतुक वाटलं आणि त्यांच्याबद्दल असणारा आदर आणखी वाढला. नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. 

तर सरांनी या पत्राचे त्यावेळी अभिवाचन केले, त्यांच्या भारदस्त आवाजात न जन्मलेल्या मुलीचे स्वगत त्यांनी अजरामर केले. माझ्या लिखाणाने सुद्धा जे साध्य झाले नाही, त्याच्या पाचपट परिणाम सरदेशमुख साहेबांच्या आवाजाने साधला. 

आपल्या लिखाणाला मर्यादा आहेत याची पुन्हा एकदा जाणीव झाली... परंतु सरदेशमुख साहेबांचा आवाज अमर्याद आहे; याचीही प्रचिती आली. 

सरदेशमुख साहेबांच्या आवाजात न जन्मलेल्या मुलीच्या आवाजातले चढ उतार, मनातल्या मनात चाललेली घालमेल, आतल्या आत मुलीचं गुदमरून रडणं, बाबांना लाडीगोडी लावणं, आणि आतल्या आत संपुन जाणं... अक्षरशः हे सर्व काही त्यांनी जिवंत करून ठेवला आहे. 

अंगावर काटा येतो हे ऐकून...! 

सरदेशमुख साहेब, अभिवाचन करताना अक्षरशः तिचं जगणं जगले आहेत... शेवटच्या क्षणी तीचं "जाणं" सुद्धा त्यांनी "अमर" करून ठेवलं...!!! 

एकदा त्यांचा संदेश आला, 'की डॉक्टर, मी हे स्वगत त्यावेळी एका दमात वाचूच शकलो नाही... वाचताना खूपदा ब्रेक घ्यावा लागला... जेव्हा वाचन संपलं, त्यानंतर दोन दिवस मी आत्ममग्न होतो... कोणतेही रेकॉर्डिंग करू शकलो नाही .... मी भानावरच नव्हतो....!' 

त्यांच्या या भावविभोर शब्दांनी मी खरोखर भारावून गेलो. त्यांच्यासारख्या जेष्ठ कलावंताची... नव्हे; खऱ्याखुऱ्या माणसाची हि प्रतिक्रिया मी मनात जपून ठेवली आहे, वहीत जपलेल्या पिंपळाच्या पानासारखी... ! 

त्यांचे शेकडो चाहते भारत आणि भारताबाहेर आहेत. आज त्यांच्या एका चाहत्याने मला हा ऑडिओ परत पाठवला. ऑडिओ ऐकून, व्हायचं तेच झालं... पुन्हा रडलो... पुन्हा पुन्हा रडलो... 

सरदेशमुख साहेबांच्या आवाजात न जन्मलेल्या मुलीचे स्वगत ऐकून गलबलून गेलो... ! माझ्या या न जन्मलेल्या मुलीचा सरदेशमुख साहेब बाप झाले...! त्यांनी केलेला हा ऑडिओ माझ्या आयुष्यातला, एक सर्वोत्तम मास्टरपीस आहे...!!! 

आणि म्हणून आपणास हा ऑडिओ पाठवीत आहे. आपणासही न जन्मलेल्या मुलींना आपल्या बाबांना घातलेली साद अनुभवावीशी वाटली, तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.


आतमध्ये कुठे खळबळ झाली... डोळ्यातून पाणी आले... हुंदके आवरेनासे झाले... तर, याला सर्वस्वी जबाबदार श्री दत्ताजी सरदेशमुख साहेब आहेत. मनातल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त कराव्याशा वाटल्या; तर 8329730186 या त्यांच्या व्हाट्सअप नंबर वर जरूर व्यक्त कराव्यात.

(फोन कॉल्स शक्यतो नकोत, ही विनंती, रेकॉर्डिंग मध्ये असल्यामुळे फोन बऱ्याच वेळा घेतले जात नाहीत किंवा लोकांशी सतत बोलून आवाजावर ताण येतो)

तर हे बाप माणसा... माझ्या न जन्मलेल्या मुलीचा पालक म्हणून, मी साष्टांग नमस्कार घालतो, तेवढा स्वीकार करावा... !!! 

दिनांक 23 सप्टेंबर 2024

*डॉ अभिजीत सोनवणे* 
*डॉक्टर फॉर बेगर्स*
*सोहम ट्रस्ट पुणे* 
*9822267357*
*sohamtrust2014@gmail.com*