| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ५ सप्टेंबर २०२४
कॅक्टस् म्हणजे आपल्या देशी भाषेत ज्याला निवडुंग म्हणतात त्या जातीचे झाड. हे झाड उष्ण प्रदेशात कमी पाण्यावर, खडकाळ भागात अगदी वाळवंटासुद्धा वाढते, जिवंत राहते. याच्या सर्वांगावर खूप काटे असतात. पण काळानुसार यांना मनमोहक आकार प्राप्त होतो, सुंदर फुले येतात.
निसर्गाने कॅक्टसची योजना आपल्याला कांही महत्वाच्या गोष्टी शिकवण्यासाठी मुद्दाम केली असावी... कॅक्टस् आपल्याला सांगतो माझ्याकडे पहा, कोणत्या परिस्थितीत मी वाढतो, स्वतःचा विकास करून घेतो. आपले मन खंबीर असले, विचार व्यापक असले की बाह्य परिस्थिती कितीही कठिण असो, स्वतःची वाढ तर होतेच होते, विकासही करता येतो आणि जीवन जगता येते.
पुढे जाऊन कॅक्टस् आपल्याला सांगतो बाह्य रूप कसेही असो, देहाचा आकार कसाही असो, काटे फक्त बाहेर असावेत, आतमध्ये नसावेत. कारण कोणत्याही वस्तुचे मूल्य, व्यक्तिमत्व बाहेरच्या दिखाव्यावरून ठरवले जात नाही, तर त्याच्या आतमध्ये, अंतरंगामध्ये काय आहे त्यावर ठरवले जाते.
श्री संत चोखामेळा सांगतात -
“ऊस डोंगा परि, रस नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा।,
कमान डोंगी परि, तीर नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा।,
नदी डोंगी परि, जल नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा।, चोखा डोंगा परि, भाव नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा।
बाह्य रूप, देखावा कसाही असो, कितीही वाईट, काटेरी, ओंगळ असो, अंतरंग चांगले असले की स्वतःचे जीवन विकसित, आनंदी, समाधानी तर होतेच होते पण काटेरी, ओंगळ बाह्य दर्शनाकडे फारसे लक्ष न देता सहवासात येणा-या इतरांनाही आनंदाचा लाभ होतो.
कॅक्टस् आपल्याला जी सर्वात महत्वाची शिकवण देतो ती म्हणजे, बीजारोपण होऊन बीजाची योग्य वाढ झाली असता हंगामामध्ये कुरूप, काटेरी झुडपालाही सुंदर फुले येतात. म्हणजेच चांगली संगती, सुशिक्षण, योग्य मार्गदर्शन यांच्या आधारावर वैचारिक प्रगती होऊन अंतरंग निर्मळ झाले, की योग्य काळी प्रत्येकाच्या अंतर्यामी उपजत असलेली सुंदरता वेगवेगळ्या दृश्य रूपाने बाहेर प्रगट होते आणि स्वतःला व इतरांना आनंदीत करीत असते.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण.