Sangli Samachar

The Janshakti News

मिरजेतील नूर हॉटेलने महापालिकेची वीस लाखांची घरपट्टी बुडवल्याची मिरज सुधार समितीची आयुक्तांकडे तक्रार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ सप्टेंबर २०२४
मिरज शहरातील दर्गा रोड येथील सि.स.नं. ८००३/अ-५ क्रमाकांच्या मिळकतीवरील महापालिकेची कोणतेही परवानगी न घेता सुमारे ५६० चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये बांधण्यात आलेल्या हॉटेल नूरने महापालिकेकडून कोणतीच बांधकाम परवनगी घेतली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाय, दुमजली सुमारे ५८० चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम असताना केवळ ११७.२१ चौरस मीटर बांधकाम दाखवून गेल्या ३० वर्षात महापालिकेचे सुमारे २० लाखांची घरपट्टी बुडविल्याचा प्रकारही समोर आला आहे. याबाबत चौकशी करून संबधित मिळकतधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी यांनी महापालिका आयुक्तांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील दर्गा रोड येथील सि.स.नं. ८००३/अ-५ क्रमाकांच्या सुमारे २८० चौरस मीटर क्षेत्रफळ मिळकतीमधील संपूर्ण क्षेत्रफळामध्ये बांधकाम क्षेत्रफळ २८० चौरस मीटर म्हणजे एकुण पहिला व दुसऱ्या मजल्याचे मिळून सुमारे ५६० चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर मिळकतीमध्ये हॉटेल नूर नावाचे हॉटेल आहे. इतकी टोलेजंग इमारत असताना या इमारतीचे बांधकाम परवाना घेतला आहे की नाही? याची कसलीही चौकशी गेल्या ३० वर्षात महापालिकेकडून करण्यात आली नाही. शिवाय, सदर नूर हॉटेलचे बांधकाम सुमारे ५८० चौरस मीटर असताना, महापालिका घरपट्टी विभागात केवळ ११७.२१ चौरस मीटर क्षेत्रफळाची घरपट्टी आकारली आहे. यात नगररचना व घरपट्टी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लांगेबांधे असण्याची शक्यता आहे.


म्हणून या गैरकारभाराची सखोल चौकशी करून संबधित मिळकतधारकांवर दंडात्मक कारवाई बरोबरच महापालिका नगररचना आणि घरपट्टी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मिरज सुधार समि तीचे ॲड. ए. ए. काझी यांनी केली आहे.